

अॅबिया-नायजेरिया; वृत्तसंस्था : भारताचा अव्वल पॅरा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने नायजेरियातील पहिल्या अॅबिया पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला उत्कृष्ट फॉर्म कायम राखत तीन सुवर्ण पदके जिंकली आणि पॅरा बॅडमिंटन सर्किटमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. प्रमोदने या स्पर्धेत पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन इव्हेंटसमध्ये अव्वलस्थान काबीज करत नवा इतिहास रचला.
भगतने पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात देशबांधव मंटू कुमारला 21-7, 9-21, 21-9 अशा तीन गेममध्ये पराभूत करत पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर त्याने सुकांत कदमसोबत जोडी जमवत दुसरे सुवर्णपदक जिंकले. या जोडीने पेरूच्या गेर्सन जायर वर्गास लोस्टॉनाऊल आणि डायना रोजास गोलास यांना 21-13, 21-17 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले. हाच धडाका कायम ठेवत त्याने मिश्र दुहेरीत आरती पाटीलसोबत आणखी एक रोमांचक अंतिम सामना जिंकून तिसरे सुवर्णपदक निश्चित केले.