कोल्हापूर : आपण मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून सातत्याने आपल्याला दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव हे मोलाचे मार्गदर्शन करत आहेत. एवढेच नव्हे, तर गोव्याच्या विकासातही प्रत्येक टप्प्यावर त्यांचे मोलाचे सहकार्य नेहमीच असते. यापुढेही त्यांच्या या मार्गदर्शनाचा आम्हाला लाभ होईल, असे गौरवोद्गार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन गोवा सरकारच्या वतीने त्यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. सावंत यांनी शाल, श्रीफळ तसेच दुर्मीळ वारसा लाभलेल्या गोव्यातील मंदिरांचे गोवा सरकारने प्रसिद्ध केलेले ‘टेम्पलस् ऑफ गोवा’ हे पुस्तक भेट देऊन डॉ. प्रतापसिंह जाधव, तसेच सौ. गीतादेवी जाधव यांचा सत्कार केला. यावेळी ‘पुढारी’ समूहाचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव उपस्थित होते. यावेळी सामाजिक, राजकीय विषयांवरही चर्चा झाली.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दै. ‘पुढारी’च्या वाटचालीबाबत आस्थेवाईकपणे चौकशी केली. विशेषतः, ‘पुढारी न्यूज’ चॅनल हे अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचे आवर्जून सांगितले. डॉ. योगेश जाधव त्यासाठी परिश्रम घेत आहेत, हे मला माहिती आहे, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, असे सांगून डॉ. सावंत यांनी ‘पुढारी’ समूहाला शुभेच्छा दिल्या.
आपण कोल्हापुरात शिक्षण घेतले याचा संदर्भ चर्चेत आला. तेव्हा डॉ. सावंत यांनी विद्यार्थिदशेपासूनच आपण ‘पुढारी’चे वाचक असून, आता ‘पुढारी’ रेडिओ, डिजिटल आणि टी.व्ही. चॅनल अशा माध्यमांच्या सर्व क्षेत्रांत यशस्वी अशी चौफेर वाटचाल करत आहे. ‘पुढारी’विषयी आपल्याला कोल्हापुरात शिक्षण घेत असल्यापासून ममत्त्व आहे. याच नात्यातून आपण ‘पुढारी’कडे कायमच मार्गदर्शकाच्या भूमिकेत पाहत आलो आहे. आपल्याला वैयक्तिकरीत्या डॉ. प्रतापसिंह जाधव हे करत असलेले मार्गदर्शन मोलाचे ठरत आले आहे. त्याचबरोबरच गोव्याच्या विकासाबाबतही त्यांचे मार्गदर्शन नेहमीच मोलाचे असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे समित कदम, विजयसिंह माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते.
‘सिंहायन’ या मराठी आत्मचरित्राची प्रत डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी डॉ. प्रमोद सावंत यांना भेट दिली. यावेळी डॉ. जाधव यांनी याची हिंदी व इंग्रजी आवृत्ती प्रकाशनाच्या मार्गावर असल्याचे सांगितले. त्यावर डॉ. सावंत यांनी, तुम्ही हिंदी आवृत्तीचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत करणार असल्याचे मला समजले आहे. मात्र, ‘सिंहायन’च्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन हे गोव्यात करावे, त्यासाठीचे निमंत्रण आपण आजच येथे दिल्याचे डॉ. सावंत यांनी आवर्जून सांगितले.