पणजी : प्रभाकर धुरी
'बाघुनी - डान्स लाइक अ टायगर' हा ओडिया चित्रपट ओडिशातील पारंपरिक वाघ नृत्यातील लिंगभेद मोडणाऱ्या तरुण मुलीची गोष्ट आहे. चित्रपट लैंगिक समानतेचा पुरस्कार करतो. समाजाने महिलांना पुरुषांप्रमाणे समानता, प्रतिष्ठा, अस्मिता, स्वाभिमान देताना हात आखडता घेऊ नये, हाच संदेश चित्रपट देतो.
हा चित्रपट रविवारी, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी इफ्फीमध्ये गाला प्रीमियरमध्ये दाखवण्यात आला. चित्रपट ओडिशामधील असला, तरी त्यातील निसर्ग, तिथल्या माणसाचे जगणे, माणसामाणसांमधील भेदभाव, समाजातील आहे आणि नाही असे दोन गट, लैंगिक भेदभाव सगळे प्रत्येकाला आपल्याकडचेच आहे असे वाटावे असे. आपल्या परंपरा, संस्कृती जपणारी एक पिढी, त्या परंपरा, संस्कृती आपल्या मुलाने पुढे न्यावी अशी अपेक्षा बाळगणारी.
अशाच एका दुर्गम गावातील पारंपरिक वाघ नृत्याची मध्यवर्ती संकल्पना असलेली 'बाघुनी' ची ही कथा. ही गोष्ट आहे ओडिशातील एका दुर्गम गावातील ११ वर्षांची मुलगी, मिनीची. मिनीला भावासारखे 'बाघा नाचा' कलाकार होण्याचं स्वप्न आहे. बऱ्याच काळापासून पुरुषांचं वर्चस्व असलेला पारंपरिक वाघ नृत्य प्रकार 'बाघा नाचा' ही एक सांस्कृतिक प्रथा आहे, जी मिनीला आपल्या अटींवर स्वीकारायची आहे. तिच्यासाठी ही आकांक्षा केवळ नृत्य सादर करण्याबद्दल नाही, तर स्वप्न पाहण्याचे व त्याचा पाठलाग करून ते प्रत्यक्षात आणण्याचे स्वातंत्र्य मिळविण्याबरोबरच बुरसटलेल्या रूढींना आव्हान देण्याबद्दल आहे.
मिनीला नदी तीरावर बसलेली असताना वाघदेवता येऊन एका कथेचा दाखला देते आणि तिला तिच्यातील वाघनृत्य करणारा कलाकार ओळखायला सांगते. यातून मिनीचा निर्धार आणखी पक्का होतो.
खऱ्या घटनांपासून प्रेरित 'बाघुनी' (डान्स लाइक अ टायगर), राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्मात जितेंद्र मिश्रा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट, एका तरुण मुलीच्या खोलवर रुजलेल्या लिंगभेदांना आव्हान देण्याच्या निर्धाराची कथा सांगतो. ओडिशाच्या दोलायमान लोकपरंपरांच्या पार्श्वभूमीवर, हा चित्रपट लिंगभेद, सामाजिक कंडिशनिंग, सांस्कृतिक ओळख आणि प्रस्थापित नियमांवर प्रश्न उपस्थित करण्याच्या धैर्याचा शोध घेतो. 'बाघा नाचा' ला सांस्कृतिक पार्श्वभूमी असली, तरी कथा शेवटी लैंगिक समानता, धैर्य आणि मानवी भावनेचा उत्सव साजरा करते. समान संधी दिल्यास मुली उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हा संदेश चित्रपट देतो.
'बाघा नाचा' हे पारंपरिक वाघ नृत्य, आणि 'बाघुनी' म्हणजे वाघीण, यांच्यातील विरोधाभास हा कथानकाच्या केंद्रस्थानी असल्याचे अधोरेखित झाल्याने चित्रपटाला खोली आणि उत्सुकता मिळते. चित्रपटात चार मुली आणि एक मुलगा यांचा चमू आहे. ही सर्व मुले नॉन अॅक्टर; पण सहा महिने त्यांना अथक परिश्रम करून प्रशिक्षित केल्याने त्यांच्या अभिनयात कुठेही पहिल्या प्रयत्नांची छाप दिसत नाही, तर ती कसलेले कलाकार वाटतात.. बाघुनीमध्ये मिनीचे रजस्त्रवा होणे आणि घरच्यांकडून तिच्यावर सामाजिक बंधने लादणे ती मोठी झाल्याचे सूचक असल्याचे दाखवण्यात आले आहे. भाऊ हवे तेव्हा बाहेर जाऊ शकतो, मी का नाही, तो वाघ नृत्य करू शकतो मी का नाही, असे बालसुलभ प्रश्न आईला विचारते. गावातील जमीनदार चौधरी ती वाघनृत्य शिकते म्हटल्यावर वडिलांना दम देतो आणि वडील तिच्याशी बोलणे बंद करतात. अशावेळी आई भगवतीच्या पूजेसाठी जाताना तिच्या जन्माची आठवण करून देते.
ती म्हणते तुम्हाला आठवते का, जेव्हा मिनी जन्माला आली, तेव्हा तुम्ही तिला कितीतरी वेळ हातात घेऊन उमे होता. मुलगी व्हावी अशी तुमची इच्छा होती. ११ वर्षांनी मुलगी झाली तेव्हा तुम्ही म्हणाला होता आमच्या पोटी भगवतीच जन्माला आली आणि आता ती भगवतीचे वाघ नृत्य करू पाहते, तर तिला विरोध करता, का तर ती मुलगी आहे म्हणून ? कदाचित देवीचीच तशी इच्छा असेल, असे सांगितल्यावर मिनीच्या वडिलांचा राग मावळतो. सतत इगो बाळगणाऱ्या, मुलींना कमी लेखणाऱ्या चौधरीची मुलगी आणि पत्नी मिनी व चमूला प्रोत्साहन देतात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावतात व पहिले बक्षीसही जिंकतात. ज्या चौधरीच्या माणसांनी मिनीच्या भावाला वाघ नृत्यात सहभाग घेऊ नये म्हणून एक पाय जायबंदी करून परावृत्त केले होते, त्याचीच बहीण मिनी भाऊ आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करते.