मडगाव : माध्यमांशी संवाद साधताना माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर. सोबत अन्य. 
गोवा

Goa Margao Street Vendor Issue | मडगाव येथील फेरीवाल्यांचा प्रश्न चिघळला

तत्काळ कारवाई करा; बाबू आजगावकरांचा २४ तासांचा अल्टिमेटम

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : मडगाव शहरातील रस्त्यांवर आणि पदपथांवर सुरू असलेल्या फेरीविक्रीमुळे गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप करत गांधी मार्केटमधील व्यापारी संघटनेचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी प्रशासनाला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. मडगाव पोलिस स्थानक परिसरासह शहरातील विविध ठिकाणी रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली असून प्रशासनाने दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

गांधी मार्केटमध्ये अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना दुकानांचे भाडे, वीज, विविध शुल्क तसेच अन्य खर्च सहन करावा लागतो. त्याचवेळी रस्त्याच्या कडेला किंवा पदपथावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमुळे अधिकृत बाजारातील व्यापाऱ्यांना थेट स्पर्धेला सामोरे जावे लागत असल्याचा आजगावकर यांचा दावा आहे. या परिस्थितीमुळे अनेक वर्षांपासून बाजारात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फेरीविक्रेत्यांचा प्रश्न मडगावमध्ये नवीन नाही. यापूर्वीही गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मडगाव नगरपालिका प्रशासनाकडे शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत विक्रीविरोधात कारवाईची मागणी केली होती. पदपथ मोकळे करावेत आणि नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती. प्रशासनाने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यापूर्वी देण्यात आला होता.

दरम्यान, मडगाव पोलिस स्थानकासमोरील रस्त्यावर स्थानिक भागातून भाजीपाला व अन्य शेतीमाल घेऊन येणारे विक्रेतेही व्यवसाय करतात. केपे, सांगे आणि काणकोण परिसरातील अनेक महिला विक्रेते स्वतःच्या शेतातील किंवा गावातून गोळा केलेला भाजीपाला व कंदमुळे मडगावमध्ये विक्रीसाठी आणतात. या विक्रेत्यांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने ते अनेक वर्षांपासून रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत असल्याचे वृत्त आहे.

या स्थानिक विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्याशिवाय त्यांच्यावर कारवाई करू नये, अशी भूमिका मंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी घेतली होती. मात्र, अद्याप प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने हा वाद कायम आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT