वेंगुर्ले; पुढारी उत्तसेवा : आपण २२ जानेवारीला होणाऱ्या एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पुढे जात आहोत. प्रभू रामचंद्रानी जे आदर्श प्रस्थापित केले त्या मार्गांवर आपण चाललो तर खऱ्या अर्थाने आपण रामराज्याचे पाईक ठरू, असे प्रतिपादन कोकण राष्ट्रीय स्वयंसवक संघाचे सहसंचालक अर्जुन उर्फ बाबा चांदेकर यांनी वेंगुर्ले येथे बोलताना व्यक्त केले.
सिंधुसंकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह येथे आज (दि.१५) अयोध्या या महानाट्याचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व श्रीरामांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लवू महाडेश्वर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, युवा नेते भाई सावंत, भागवत प्रबोधिनीचे संजय पुनाळेकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , निर्माते प्रणय तेली , भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर आदी उपस्थित होते.
चांदेकर पुढे म्हणाले, संपूर्ण देशामध्ये एक राममय वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या मातृभूमीप्रती असलेला भाव महत्वाचा आहे. एका प्रचंड संघर्षाच्या धारेतून निघालेला भारतीय समाज २२ जानेवारीला होणाऱ्या प्रतिष्ठापनाच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पुढे जात आहे. त्याच धर्तीवर आज वेंगुर्ले येथे अयोध्या या एका चांगल्या महानाट्याची सुरुवात होत असून हा आपल्या सर्वासाठी चांगला क्षण आहे. प्रभू रामाची आराधना करीत असताना त्यागाची, समर्पणची भावना निर्माण झाली पाहिजे, त्यासाठी रामाचे आदर्श जपणे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी पंतप्रधान मोदींमुळे परिवर्तन पहायला मिळत असून नवीन पर्व सुरु होत आहे, असे विचार व्यक्त केले. प्रणय तेली यांनी अयोध्या महानाट्याबाबत रूपरेषा स्पष्ट केली. तसेच माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी आपल्या कारकिर्दीत अप्रतिम असे नाट्यगृह उभारले असून आज त्याचा फायदा होत आहे , असे म्हटले. माजी आ. राजन तेली , भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही विचार व्यक्त केले. रामाचे आदर्श जपणारे कार्यक्रम सिंधुदुर्गात होताहेत , हे निश्चितच अभिमानास्पद आहे, असे ते म्हणाले. यावेळी श्री. बागलकर, गजानन दामले यांचा योगदानाबद्दल शाल, श्रीफळ व राममंदिर प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट नियोजनाबद्दल प्रसन्ना देसाई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर खानोलकर , स्वागत प्रसन्ना देसाई , सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.
हेही वाचा :