फोंडा : कायदा सुरक्षेची अव्यवस्था, कैद्यांमधील हाणामाऱ्या, तसेच ड्रग्ज रामनाथ गावडे तस्करीवरून नेहमीच चर्चेत असलेले कोलवाळ कारागृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. येथील सहायक तुरुंगाधिकारी रामनाथ पंढरी गावडे (वय ५५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन केलेल्या आत्महत्येमुळे संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. कारागृहातील वरिष्ठांकडून होणाऱ्या सतावणुकीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच कामगार नेत्यांनी केली आहे.
गेले काही दिवस तणावात असलेल्या रामनाथ गावडे यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्जही दाखल केला होता मात्र नंतर हा अर्ज त्यांनी मागे घेतला होता. कोलवाळ कारागृहातील अंदाधुंदी सातत्याने समोर येत आहे. कारागृहातील अमली पदार्थांचा व्यवहार सर्वश्रुत आहे. एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून परिचित असलेले रामनाथ गावडे यांनी या प्रकरणाच्या तणावामुळे आत्महत्या केली की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे त्यांनी साहित्य क्षेत्रातही योगदान दिले होते.
मूळ मंगेशी येथील परंतु तिस्क उसगावात घर बांधून राहणारे मनमिळाऊ स्वभावाचे रामनाथ गावडे एक तरल मनाचे कवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तसेच एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी पंचनामा केला असून, पुढील चौकशी सुरू आहे मंगेशी येथील स्मशानभूमीत रामनाथ गावडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तो' वरिष्ठ अधिकारी कोण ?
कोलवाळ कारागृहातील सहायक तुरुंगाधिकारी रामनाथ पंढरी गावडे (वय ५५) यांची ड्युटी त्यांच्या वरिष्ठांनी कारागृहातील खाणावळ (मेस) कक्षात लावली होती. त्यांनी या ड्युटीला विरोध केला होता. मात्र, वरिष्ठांनी वारंवार सतावणूक सुरू केल्याने ते रजेवर गेले होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्जही केला होता. त्यांची होणारी सतावणूक त्यांनी खाते प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या वरिष्ठांनी त्यानंतर त्यांची तेथून बदली करण्याच्या आश्वासनावर कामावर येण्यास सांगितले. मात्र, कामावर रूजू झाल्यावर खाणावळ कक्षाच्या जबाबदारीतून मुक्त न करता तेथेच काम करण्याची सक्ती करण्यात आली. यासंदर्भातील माहिती त्यांनी आपल्या कुटुंबाला दिली होती. पुन्हा ते आजारी रजेवर गेले व तेव्हापासून ते तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे. त्यामुळे हा वरिष्ठ अधिकारी कोण, अशी चर्चा तिस्क-उसगाव परिसरात होत आहे
आत्महत्येची चौकशी व्हावी रामनाथ गावडे हे एक चांगले सरकारी अधिकारी, हुशार आणि तरल मनाच्या स्वभावाची व्यक्ती होती. मात्र, अशा व्यक्तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण काय याचे आश्चर्य वाटत आहे. गेले काही दिवस आपण तणावात असल्याचे रामनाथ गावडे यांनी आपल्याकडे कबूल केल्याचे अॅड. राजू मंगेशकर यांनी म्हटले आहे. कोलवाळ कारागृहातील कथित ड्रग्ज प्रकरणासंबंधी बळीचा बकरा करण्याचे काहीजणांचे षड्यंत्र होते काय, याची सखोल चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी स्वतः लक्ष घालून ही चौकशी करावी, अशी मागणी अॅड. राजू मंगेशकर व मंगेशीवासीयांनी केली आहे.