पणजी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) गोवा विभागातील अधिकाऱ्यांनी निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दोघा एएसआय अधिकाऱ्यांसह दोन कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ७१ निविदांपैकी तब्बल ६९ निविदा केवळ दोन खासगी कंपन्यांना देण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे.
२०२२ ते २०२५ या कालावधीत ई-निविदा प्रक्रियेद्वारे देण्यात आलेल्या कंत्राटांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप आहे. पात्र निविदादारांना डावलण्यात आले किंवा अपात्र ठरवण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एफआयआरनुसार, कंत्राटदार चंद्रशेखर यालवार आणि शिवानगौडा यांना अनुचित लाभमिळावा यासाठी तांत्रिक मूल्यांकन समितीने नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
या समितीत सहभागी असलेले एएसआयचे वरिष्ठ संवर्धन सहायक सुद्दामला श्रीकांत रेड्डी आणि तत्कालीन संवर्धन सहाय्यक एस. के. एम. तौसीफ यांचा समावेश होता. त्यांनी निविदा प्रक्रियेत पक्षपात केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, तौसीफ याने स्वतःसाठी व पत्नीकरिता विमान तिकिटांच्या स्वरूपात अनुचित लाभ घेतला. जून २०२३ मध्ये गोवा कोलकाता प्रवासासाठी सुमारे १८०२० रुपयांचे तिकीट मिळाल्याचा आरोप आहे. तसेच, तौसीफच्या खात्यात जीपेद्वारे विविध तारखांना रक्कम जमा झाल्याचेही सीबीआयने नमूद केले आहे.
पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह
यालवारकडून एप्रिल २०२४ मध्ये रेड्डीला २५८० रुपये यूपीआयद्वारे दिल्याचा आरोप असून, ही रक्कम अनुचित लाभाचा भाग असल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. सीबीआयकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सरकारी कामकाजातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे