

पणजी : पुढारी वृत्तसेवा
तुये येथील नव्याने बांधलेले इस्पितळ गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) शी संलग्न करा, अशी मागणी करत तुये येथील नागरिक आंदोलन करत असताना आरोग्य संचालनालयाने दर आठवड्याला गोमेकॉचा एक तज्ज्ञ डॉक्टर तुये येथे पाठवण्याचा एक प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मान्यता दिली आहे.
या प्रस्तावानुसार, तुये इस्पितळात गोमकॉतील डॉक्टर सेवा देणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे यांनी सांगितले. तुये इस्पितळ ३० जानेवारीपासून कार्यान्वित होणार असल्याचे आश्वासन मंत्री राणे यांनी विधानसभा अधिवेशनात दिले आहे. त्यानुसार हे इस्पितळ सुरू झाल्यानंतर गोमेकॉच्या बाह्य रुग्ण विभागातील एका विभागातून एक डॉक्टर दर आठवड्याला पाठवला जाणार आहे.
सुरुवातीला तेथे तीन बाह्यरुग्ण तपासणी विभाग सुरू केले जाणार आहेत. सदर इस्पितळ इमारत आरोग्य खात्याकडे हस्तांतरित करण्यात आलेली असून स्थनिक नागरिक ते गोमकॉशी संलग्न करण्याची मागणी करत आहेत. सध्या तुये इस्पितळ इमारतीतील बाह्यरुग्ण तपासणी विभाग, फार्मसी आणि प्रयोगशाळांची साफसफाई तत्काळ सुरू करून त्या कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सध्याच्या सामाजिक आरोग्य केंद्र इमारतीतील बाह्य रुग्ण विभाग, प्रयोगशाळा आणि फार्मसी नवीन सुविधेत स्थलांतरित करण्याची प्रक्रिया विभागाकडून राबवली जात आहे.