पणजी : पुढारी वृत्तसेवा : म्हादई कोरडी करण्याचा विडा कर्नाटकात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षासोबतच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेही उचलला आहे. या दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यात सत्तेवर आल्यानंतर लगेच कळसा व भांडुरा या म्हादईला मिळणार्या नद्यांवर धरणे बांधण्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान, या दोन्ही प्रमुख पक्षांच्या भूमिकेमुळे गोव्यात संताप व्यक्त होत आहे.
सोमवारी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पक्ष पुन्हा सत्तेवर आल्यास ठरलेल्या वेळेत कळसा भांडुरा प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज (दि.२) काँग्रेसनेही त्यावर कडी करताना पक्षाची सत्ता कर्नाटकात येताच पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत 500 कोटी रुपये कळसा, भांडुरा प्रकल्पासाठी मंजूर करून काम सुरू केले जाईल. म्हादईच्या पाण्याचा 100 टक्के वापर केला जाईल व पाच वर्षांत 3 हजार कोटी खर्च करून कळसा व भांडुरा प्रकल्प पूर्ण केले जातील, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्नाटकात कुठलाही पक्ष सत्तेवर आला, तरी म्हादईचे पाणी वळवून गोवेकरांच्या तोंडचे पाणी पळवणार, हे निश्चित झाले आहे.
सध्या कर्नाटकात विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात सुरू आहे. 10 मेरोजी मतदान होणार आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रकाशित केले आहेत.
राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी बंगळुरू येथे काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या व प्रदेशाध्यक्ष डी. शिवकुमार होते. काँग्रेसची सत्ता आल्यास पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत म्हादई प्रकल्पासाठी 500 कोटी रुपये मंजूर करू, म्हादईच्या पाण्याचा 100 टक्के वापर करू, म्हादईचे सर्व प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करू, लोकांना 200 युनिट मोफत वीज, व मोफत बससेवा उपलब्ध करू, महिलांना व बेरोजगार पदवीधरांना 3 हजार रुपये मासिक भत्ता देऊ व बजरंग दलावर बंदी घालू, अशी आश्वासने दिली आहेत.
हेही वाचा