नाशिक / बोरगाव : पुढारी वृत्तसेवा
अंगणवाडी मदतनीसपदी नियुक्ती मिळवून दिल्याचा मोबदल्यात २० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारताना सुरगाणा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पातील पर्यवेक्षिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी (दि.१९) रंगेहात पकडले.
हेमलता धवळू गाढवे (५३) असे संबंधित पर्यवेक्षिकेचे नाव आहे. या कारवाईमुळे सुरगाणा तालुक्यात खळबळ उडाली आहे. तक्रारदार महिलेच्या गुणवत्तेच्या आधारावर ३० सप्टेंबर २०२६ रोजी सुरगाणा तालुक्यातील अंगणवाडी केंद्रात मदतनीस म्हणून नियुक्ती झाली होती.
नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर त्या संबंधित अंगणवाडी केंद्रात कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या. हे केंद्र माणी बीटअंतर्गत येत असल्याने तेथील पर्यवेक्षिका हेमलता गाढवे यांनी नियुक्ती करून आदेश मिळवून दिल्याबद्दल वरिष्ठांच्या नावाने स्वतःसाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांच्याशी संपर्क साधून १२ ऑक्टोबर २०२६ रोजी तक्रार नोंदवली. तक्रारीच्या अनुषंगाने १२ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली.
यावेळी संबंधित पर्यवेक्षिकेने २० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर सोमवारी (दि. १९) सुरगाणा येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयात सापळा रचला.
पंच, साक्षीतारांसमक्ष तक्रारदार महिलेकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पर्यवेक्षिका गाढवे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. संबंधित पर्यवेक्षिकेविरुद्ध सुरगाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
आरोपीला ताब्यात घेतले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेबाबत पुढील कार्यवाही होणार आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी, भारत तांगडे, प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या देखरेखीखाली विनोद चौधरी, अनिल गांगोडे, परशुराम जाधव तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.