पणजी : पुढारी वृत्तसेवा
एसआयआर मोहिमेनंतर राज्यातील १,२७,४६८ मतदारांची नावे विविध कारणांमुळे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यात एकूण मतदारांची संख्या १०,५७,५६६ इतकी झाली आहे. पणजी महापालिकेसाठी जुन्या मतदार यादीद्वारे मतदान होणार आहे. मात्र, एसआयआर नंतर पणजी मतदारसंघातील ४,२७४ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.
त्यामुळे पणजी महापालिकेसाठी मतदान करणाऱ्या ४,२७४ जणांचे हे महापालिकेसाठी शेवटचे मतदान ठरणार आहे. गोवा राज्य मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत राज्याची नवी मतदार यादी जारी केली. गोयल म्हणाले, चार महिन्यांच्या एसआयआर मतदार पडताळणीनंतर ही नवी यादी जारी करण्यात येत आहे. जे मतदार पत्त्यावर सापडले नाहीत त्यांना नोटिसा पाठवल्या गेल्या.
ज्यांनी नोटीसला उत्तर दिले आणि योग्य ती कागदपत्रे सादर केली त्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्यात मतदानकेंद्रांची संख्या वाढवण्यात आली असून आता ती १७३१ झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. महिला मतदारांची संख्या जास्त २७ आक्टोबर २०२५ च्या यादीत राज्यात ११ लाख ८५ हजार ०३४ मतदार होते. एसआयआर नंतर ही संख्या १०,५७, ५६६ इतकी झाली आहे.
यात पुरुष मतदारांची संख्या ५,११,४३६ तर महिला मतदारांची संख्या ५,४६,१२१ आहे. ९ मतदार तृतियपंथी आहेत, अशी माहिती गोयल यांनी दिली सर्वाधिक वास्कोतील मतदार वगळले राज्यातील सर्वात जास्त मतदार वगळलेला मतदारसंघ वास्को असून येथील ११,६५७ मतदार वगळले गेले आहेत.
त्या खालोखाल कुठ्ठाळीतील ९,३८९, दाबोळी ५,४८९ व मुरगाव ४१६८ मतदारांची नावे वगळली आहेत. सर्वात कमी मतदार वगळलेला मतदारसंघ सांगे असून येथील ८२० मतदारांची नावे नव्या यादीतून वगळली गेली आहेत. दुहेरी नागरिकत्वामुळे ४२० नावे वगळली गोव्यात पोर्तुगीज पासपोर्ट असलेले १६,७२१ मतदार आहेत.
त्यातील ४२८ जणांकडे पोर्तुगीज नागरिकत्व सापडले असून त्यातील ४२० जणांची नावे वगळली असून अन्य ८ जणांची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती गोयल यांनी दिली. १८ ते १९ वर्षांचे १४,४८४ मतदार नव्या यादीत १८ ते १९ वर्षांचे १४,४८४ युवा मतदार समाविष्ट झाले आहेत. या यादीत दिव्यांग मतदारांची संख्या ८,५९६ तर ८० वर्षांवरील ज्येष्ठ मतदारांची संख्या १०,३३८ आहे.
फोंडा पोटनिवडणूक नव्या यादीनुसार फोंडा पोटनिवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. रवी नाईक यांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांत ही पोट निवडणूक घ्यावी लागणार आहे. या पोट निवडणुकीसाठी नवी मतदार यादीचा वापर होणार आहे. त्यामुळे पूर्वीच्या यादीत असलेले व आता वगळले गेलेल्या फोंडा मतदारसंघातील ३,८३१ जणांना यावेळी मतदार करता येणार नाही.
बोगस मतदार करणार मतदान : पाटकर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मतदार वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच वगळलेल्या मतदारांत अनेक बोगस मतदार असून ते यावेळेला मतदान करणार असल्याने चिंता व्यक्त केली. पाटकर यांनी सांगितले की, महानगरपालिका क्षेत्रातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणात विसंगती आहे.
पाटकर यांनी दावा केला आहे की, पणजीमध्ये ४,४५४ आणि ताळगावमध्ये ५,४४१ मतदार वगळण्यात आले आहेत. ते एसआयआर अंतर्गत सुमारे १०,००० मतदार आहेत. यात अनेक बोगस मते (मतदार) आहेत आणि राज्य निवडणूक आयोग हीच मतदार यादी वापरणार असल्याने निवडणुकीपूर्वी या घडामोडी खूप गंभीर आहेत, असेही पाटकर म्हणाले.