सांगे: गोव्यातील सांगे परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे १० कोटी रुपये किमतीची देवमाशाची उलटी (Ambergris) जप्त केली आहे. ही उलटी ५.७५ किलो वजनाची असून, तिच्या बेकायदेशीर खरेदी-विक्रीप्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये साईनाथ शेट (फोंडा), रत्नकांत कारापूरकर (सांकवाळ), आणि योगेश रेडकर (सावंतवाडी) यांचा समावेश आहे. ही उलटी विकण्यासाठी आरोपी काही खरेदीदारांच्या संपर्कात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
देवमाशाची उलटी ही अतिशय दुर्मिळ आणि मौल्यवान असून, परफ्युम आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनात तिचा वापर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारात याला प्रचंड मागणी असून, दर किलो मागे कोट्यवधी रुपये किंमत मिळते.
मात्र, भारतात तिचा साठवणूक, विक्री किंवा खरेदी करणं हे वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी जप्त केलेली उलटी वनविभागाच्या ताब्यात दिली असून, अटक केलेल्या आरोपींविरुद्ध अधिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे गोव्यात उलटीच्या बेकायदेशीर तस्करीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.