Pujashri Palayekar 
गोवा

Pujashri Palayekar | अभिनय, गायन अन् अध्यापनाचा सुरेख संगम जपणाऱ्या पूजाश्री पालयेकर

Pujashri Palayekar | रंगभूमीनेच मला कलाकार म्हणून घडवले; नाटक कधीही सोडणार नाही: पूजाश्री पालयेकर.

पुढारी वृत्तसेवा

रंगयात्रा : निवृत्ती शिरोडकर
ग्रामीण भागातील रंगभूमी ही अनेक प्रतिभावंत कलाकारांना घडवणारी सांस्कृतिक शाळा आहे. गावागावांत होणारी नाटके, उत्सव, जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांमधून कलाकारांच्या कलागुणांना आकार मिळतो. विशेषतः स्त्री कलाकारांचा रंगभूमीवरील प्रवास पाहिला, तर त्यामध्ये अभिनयाची आवड, जिद्द, मेहनत, अभ्यास, कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव आणि कलेविषयीची निष्ठा यांचा मिलाफ असतो.

अशाच अभ्यासू, संवेदनशील आणि बहुआयामी कलावंत म्हणून पूजाश्री प्रकाश पालयेकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते. पूजाश्री यांच्यासाठी अभिनय म्हणजे केवळ पाठ केलेले संवाद बोलणे नव्हे. नाटकातील पात्र समजून घेणे, त्याच्या मनात डोकावणे आणि भावविश्वाशी एकरूप होणे, ही त्यांच्या अभिनयाची सुरुवात असते.

भूमिका लहान की मोठी यापेक्षा ती किती प्रभावीपणे साकारता येईल, याला त्या अधिक महत्त्व देतात. पात्राचा स्वभाव, पार्श्वभूमी, मानसिकता, परिस्थिती आणि इतर पात्रांशी असलेले नाते समजून घेतल्यानंतर त्या भूमिक्याची तयारी करतात. संवादफेक, आवाजाचा चढ-उतार, विराम, चेहऱ्यावरील भाव, रंगमंचावरील हालचाली आणि देहबोली यांचा त्या बारकाईने विचार करतात.

नाटक करताना आपण कधीही मानधनाची अपेक्षा ठेवत नाही. रंगभूमीवर उभे राहणे, व्यक्तिरेखेत समरस होणे आणि ती भूमिका प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचवणे यातून मिळणारे समाधानच आपल्यासाठी मोठे मानधन आहे, असे पूजाश्री प्रकाश पालयेकर सांगतात. नाटकाची आवड आणि रंगभूमीवरील प्रेम यामुळेच आपण सातत्याने या क्षेत्रात कार्यरत असल्याचे त्या नमूद करतात.
त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात 'अयोध्येचा ध्वजदंड' या नाटकातून झाली. त्यानंतर 'कधीतरी कोठेतरी', 'जय जय गौरीशंकर', 'मानापमान', 'संशयकल्लोळ', 'एकच प्याला', 'ही श्रींची इच्छा', 'मत्स्यगंधा', 'सम्राट शंतनू' आणि 'संत सोयरोबानाथ' यांसारख्या नाटकांंत त्यांनी भूमिका साकारल्या. सामाजिक, ऐतिहासिक, संगीत आणि पौराणिक धाटणीच्या नाटकांत काम करताना

प्रत्येक पात्राला वेगळ्या पद्धतीने न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. साई कला मंडळ, सांगोल्डा तसेच नाट्यतरंग या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी विविध नाट्यप्रयोगात सहभाग घेतला. 'संगीत मत्स्यगंधा' आणि 'सम्राट शंतनू' या नाटकांचे प्रयोग पुणे येथे सादर करण्याची संधीही त्यांना मिळाली. गोव्याबाहेरील प्रयोगांमुळे रंगमंचावरील आत्मविश्वास वाढला आणि अभिनयातील बारकावे अधिक समृद्ध झाले. या प्रवासात हेमंत केरकर यांनी त्यांना नाट्यक्षेत्रात प्रोत्साहन दिले.

नाट्यतरंग संस्थेने दिलेल्या सहकार्यामुळे आपण अधिक सक्रियपणे काम करू शकले, असे त्या सांगतात. चंद्रशेखर गावस, डॉ. अमिता गुरव आणि विपिन तिवारी यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 'ताजमहल का टेंडर' या नाटकाचा प्रयोग विद्यापीठस्तरावर सादर करण्याची संधीही त्यांना मिळाली.

'कधीतरी कोठेतरी'च्या प्रयोगातील एका प्रसंगात त्या अचानक संपूर्ण संवाद विसरल्या. क्षणभर काय करावे हे सुचत नव्हते. मात्र सहकलाकाराने प्रसंगावधान राखत संवाद आपल्या पद्धतीने पुढे नेला. त्यानंतर पूजाश्री यांना पुढील संवाद आठवला आणि प्रयोग सुरळीत सुरू झाला. या अनुभवातून प्रसंगावधान, सहकलाकारांवरील विश्वास आणि टीमवर्कचे महत्त्व शिकायला मिळाले, असे त्या सांगतात.

नोकरी आणि नाटक यांचा समतोल साधताना वेळेचे नियोजन करावे लागते. त्यामुळे कामावर जातानाही त्या संवादांचे पाठांतर करतात. भूमिका प्रभावी व्हावी यासाठी स्वतःचे संवाद मोबाईलवर रेकॉर्ड करून पुन्हा ऐकतात. संवादफेक कुठे कमी पडते, उच्चार कुठे चुकतात आणि कोणत्या वाक्यात भाव अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येईल, याचा त्या अभ्यास करतात. त्यानंतर दिग्दर्शकाचे मार्गदर्शन घेऊन भूमिका अधिक परिणामकारक बनवण्याचा प्रयत्न करतात.

पूजाश्री यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे शिक्षण क्षेत्रातील योगदान. एका बाजूला रंगभूमीवर विविध भूमिका साकारताना दुसऱ्या बाजूला अध्यापनाच्या माध्यमातून नवीन पिढी घडवण्याचे काम त्या करत आहेत. त्यांनी एम. ए. हिंदीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्समध्ये दोन वर्षे हिंदी विषयाच्या माध्यमातून नाटक आणि नाट्यकलेशी संबंधित विषयांचे अध्यापन केल्याचे त्या सांगतात.

स्वतः कलाकार असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर रंगभूमीवरील प्रत्यक्ष अनुभव, संवादफेक, व्यक्तिरेखेचा अभ्यास आणि नाट्यप्रयोगातील शिस्त याविषयी मार्गदर्शन करता आले, हा अनुभव समाधान देणारा असल्याचे त्या सांगतात. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकातील धडे पोहोचवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना दिशा देणे होय. कुणाला अभ्यासाची, कुणाला अभिनयाची, कुणाला संगीताची तर कुणाला नृत्याची आवड असते. या गुणांना प्रोत्साहन मिळाले तर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. याच भूमिकेतून शिक्षण आणि कला यांची सांगड घालण्याचा पूजाश्री प्रयत्न करतात.

नाटक सोडणार नाही...

रंगभूमीबरोबरच चित्रपट क्षेत्राविषयीही त्यांना आकर्षण आहे. भविष्यात योग्य भूमिका आणि संधी मिळाल्यास चित्रपटात काम करण्याची त्यांची तयारी आहे. मात्र नाटक आणि रंगभूमी कधीही सोडणार नाही, कारण रंगभूमीनेच आपल्याला कलाकार म्हणून घडवले आहे, असे त्या ठामपणे सांगतात.
कलाकारांनी आपली मते योग्य पद्धतीने मांडावीत, असेही त्यांचे मत आहे. सरकारकडून कला क्षेत्राला सहकार्य मिळत असले, तरी कलाकारांनी आपल्या समस्या, अपेक्षा आणि आवश्यक सुविधांबाबत स्पष्ट प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. केवळ अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा व्यवस्थित मांडणी केल्यास त्याची दखल घेणे सोपे होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT