The Huntress  
गोवा

The Huntress Women Safety 57th IFFI |महिला सुरक्षेचा प्रश्न मांडणारा 'द हंट्रेस'

महिला सुरक्षेचा प्रश्न मांडणारा 'द हंट्रेस'

पुढारी वृत्तसेवा

पणजी : क्रांतिराज सम्राट

आधुनिक विज्ञानामुळे जग जवळ आले असून वैज्ञानिक क्रांती वेगाने होत आहे. मात्र, त्याचबरोबर गुन्हेगारी प्रवृत्ती आणि घटनांमध्येही वाढ होत आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर तत्काळ उपाय शोधण्याच्या प्रयत्नात माणूस गुन्हेगारीकडे वळतो आणि स्वतःसह कुटुंबालाही संकटात टाकतो. याच परिस्थितीचे चित्रण सुझाने अँड्र्यू कोरेआ यांनी 'द हंट्रेस' या चित्रपटातून केले आहे.

५७ व्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हा मेक्सिकन-अमेरिकन चित्रपट सोमवारी दाखविण्यात आला. अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि बेपत्ता महिलांचा शोध घेऊन गुन्हेगारांना शिक्षा करण्याच्या बाबतीत कायदा व सुव्यवस्था अपुरी पडते, तेव्हा अन्यायग्रस्त व्यक्ती स्वतःच कायदा हातात घेते. मात्र, या प्रयत्नांतून ती स्वतःसह कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रांनाही संकटात टाकू शकते.

चित्रपटात बसचालकांकडून अल्पवयीन शालेय मुलींवर बलात्कार केले जातात. एका पीडितेची मदतीसाठीची हाक तिच्या आईपर्यंत तत्काळ पोहोचत नाही. आपल्या मुलीला सुरक्षित वातावरण मिळावे, तिला मुक्तपणे फिरता यावे आणि स्वतंत्र जीवन जगता यावे, यासाठी एक महिला स्वतःच कायदा हातात घेते. वेशांतर करून ती बसमधून प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाचा गोळ्या घालून खून करते. त्यानंतर वेशांतरासाठी वापरलेले साहित्य फेकून देऊन कामाच्या ठिकाणी जाते.

रात्री तिच्या घरी पोहोचलेले पोलिस तिच्या शाळकरी मुलीचीही चौकशी करतात. तपासाच्या नावाखाली मुलीला कपडे उतरवण्यास सांगितले जाते. त्यामुळे स्वतःच्या कृत्यानंतरही आपली मुलगी सुरक्षित नसल्याची जाणीव त्या महिलेला होते. अशाच प्रसंगात मुलगी गमावलेली आणखी एक महिला तिच्या मदतीला येते. पोलिसांची पाळत असतानाही ती पोलिस स्थानकावर मोर्चा नेते. बसचालकाचा खून करणाऱ्या महिलेची कृती योग्य असल्याचे सांगतानाच किती महिला बेपत्ता झाल्या आणि त्यांचा शोध का लागला नाही, असा प्रश्न उपस्थित करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT