गोवा

गोव्यात पर्यटकांची लूट करणाऱ्या ३० दलालांना अटक

मोहन कारंडे

पणजी : पुढारी वृत्तसेवा : गोव्यात आलेल्या पर्यटकांना विविध आमिषे दाखवून त्यांना लुटणार्‍या ३० टाऊटस अर्थात दलालांना गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने आज (दि. २९) अटक केली. कळंगुट समुद्रकिनारी परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईचे पर्यटकांनी स्वागत केले आहे.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वालसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात आलेल्या पर्यटकांना विविध आमिषे दाखवून डान्सबार, रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये नेले जाते आणि तेथे त्यांना अक्षरशः लुटले जाते. अशा अनेक तक्रारी पर्यटन खात्याकडे आणि पोलिसांकडेही ईमेलद्वारे दाखल होत होत्या. कळंगुट या समुद्रकिनारी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अशा बेकायदेशीर गोष्टी होत असल्याचे दिसून येत होते. रस्त्याच्या बाजूला उभे राहणारे हे दलाल पर्यटक आल्यानंतर त्याला गाठून त्यांना विविध आमिषे दाखवून ठरवलेल्या हॉटेल, रेस्टॉरंट, डान्स बारमध्ये घेवून जात असत. तेथे त्यांच्याकडून भरमसाठ शुल्क वसूल केले जायचे. अशा तक्रारी वारंवार वाढल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनीही किनारी भागांमध्ये दलालांची संख्या बेसुमार वाढल्याची चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वालसन यांनी कळंगुट पोलिस स्थानकावर यापुर्वी कधीही ड्युटी न बजावलेल्या पोलिसांचे एक पथक स्थापन केले. त्या पथकामध्ये वाळपई पोलीस स्टेशन, डिचोली पोलिस स्टेशन आणि इतर पोलिस स्थानकातील पोलिसांचा समावेश करण्यात आला. हे पोलीस साध्या वेशामध्ये पर्यटकाच्या पेहरावात कळंगुट परिसरामध्ये फिरताना दलालांनी त्यांना गाठले, त्यांना आमिष दाखवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी अशा ३० दलालांना अटक केली. फक्त कळंगुट समुद्रकिनारा परिसरामध्येच ३० दलालांना अटक करण्यात आले असून इतर समुद्रकिनार्‍यावरील अशा दलांलावर कारवाई करण्यात येणार असल्याचे वालसन यांनी सांगितले.

दरम्यान, कळंगुट समुद्रकिनाऱ्यावरील दलालांना अटक केल्यानंतर इतर समुद्र किनाऱ्यावरचे दलाल सतर्क झाले असून ते सध्या भूमिगत झाल्याचे कळते. पोलिसांच्या या कारवाईचे पर्यटकांनी स्वागत केले आहे. गोव्यात दरवर्षी येणाऱ्या ४० ते ४२ लाख पर्यटकांना या कारवाईमुळे दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT