पुढारी ऑनलाईन : जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यात नोकरकपात सुरू आहे. भारतातील स्टार्टअप्सही यापासून अलिप्त राहिलेल्या नाहीत. बायजूस, रिबेल फुड्स, ओला, मोहल्ला टेक, डुंझो अशा स्टार्टअपनी कर्मचारी कपात केल्यानंतर गो मेकॅनिक या स्टार्टअपने ७० टक्के कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तसेच जे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांना ३ महिने विनापगार काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गो मेकॅनिकमध्ये जवळपास १ हजार कर्मचारी आहेत. (Go Mechanic Lay offs)
गो मेकॅनिकलच्या ताळेबंदात अनियमितता असल्याचे सहसंस्थापक अमित भसिन यांनी मान्य केले आहे. वाढ दाखवण्यासाठी आम्ही मोहात पडलो, असे त्यांनी म्हटले आहे. गो मेकॅनिक हा प्लॅटफॉर्म असून यावर वाहन दुरुस्ती, सुट्या भागांची विक्री, सर्व्हिसिंग अशा सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जातात. या संदर्भातील सेवा देणारे देशातील सर्वांत मोठे प्लॅटफॉर्म गो मेकॅनिक आहे.
गो मेकॅनिकची स्थापना २०१६ला झाली. २०२१ला या स्टार्टअपमध्ये सिक्वोइया कैपिटल, टायगर ग्लोबल, ओरियस व्हेंचर पार्टनर्स, चित्राती व्हेंचर्स अशा गुंतवणुकदार कंपन्यांनी ३४१ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. सध्या मात्र ही स्टार्टअप आर्थिक संकटातून जात आहे.
भसिन यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट लिहिली आहे, यात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "सध्याच्या स्थितीची सर्व जबाबदारी स्वीकारत आम्ही गो मेकॅनिकची पुनर्रचना करत आहोत. ७० टक्के कर्मचाऱ्यांना यामुळे कामावरून कमी करावे लागत आहे. शिवाय एका तटस्थ संस्थेकडून कंपनीचा ताळेबंद तपासला जाईल."
हेही वाचा