पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी अनिष्ठ व्यवसायांशी संबंध असलेल्या लोकांशी संपर्कात आहेत. ते परदेशात जाऊन अशा व्यावसायिकांशी भेटत असतात. याबाबत मी १० पुरावे देऊ शकतो, असा गौप्यस्फोट माजी मंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी केला. राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटला उत्तर देताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. आझाद एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. राहुल गांधी यांच्यासमवेत त्यांच्या कुटुंबीयांचेही अनिष्ठ व्यवसायाशी संबंध असलेल्या लोकांशी संबंध आहेत, असा आरोपही आझाद यांनी या वेळी केला.
या वेळी आझाद (Ghulam Nabi Azad) म्हणाले की, देशात आता काँग्रेस शिल्लक राहिलेली नाही. केवळ काही लोक काँग्रेसमध्ये थांबलेले आहेत. राहुल गांधी आणि पक्षाचा कोणताही जनमानसांवर प्रभाव राहिला नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसून आलेला नाही. काही लोक म्हणतात की, यात्रेनंतर राहुल गांधी यांचा प्रभाव वाढलेला आहे. परंतु, मला तसे काही वाटत नाही. सुरत न्यायालयात राहुल गांधी आले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ कुठेही तरूण किंवा शेतकरी रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले नाही, असेही आझाद म्हणाले.
काँग्रेसमधील जुने नेते आता पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन काठावर आले आहेत. तर नव्या पिढीतील १० टक्के कार्यकर्तेही नाराज आहेत. ए. के. एंटनी यांच्या साऱख्या जुन्या नेत्याचा पुत्र अनिल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अनिल सारख्या नेत्याने काँग्रेसमधून बाहेर पडणे दुर्भाग्यपूर्ण आहे. राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व कऱण्याची क्षमता नाही. त्यामुळे ५० वर्षांपेक्षा कमी वयाचे नेते काँग्रेसमधून बाहेर पडू लागले आहेत. राहुल गांधी यांच्याकडे दिशा नाही, असेही आझाद म्हणाले.
दरम्यान, राहुल गांधी यांनी शनिवारी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये गेलेल्या जुन्या नेत्यांवर टीकेची झोड उठवली होती. राहुल गांधी यांनी एक ट्विट करून उद्योगपती गौतम अदानी यांच्यासोबत गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, किरण रेड्डी, अनिल अँथनी आणि हिमंता बिस्व सरमा यांचे नाव जोडले होते. या सर्व नेत्यांनी मागील काही वर्षात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
हेही वाचा