तासगाव : पुढारी वृत्तसेवा मानवी वस्तीत वन्यप्राणी येण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. मानवी वसाहतींचेच या प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण होत असल्याने या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यामुळे आज बिबटे, गवे, सांबर, कोल्हे, हत्ती यासारखे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वसाहतीत दिसू लागली आहेत. असाच एक भलामोठा गवा रेडा भर दुपारी गावात आला अन् त्याने चक्क शेततळ्यात पोहण्याचा आनंद लुटला. काही वेळानंतर थंड झाल्यावर तो शेततळ्यातून ऐटित बाहेर आला आणि आपल्या वाटेने निघून गेला. मात्र यावेळी स्थानिकांची चांगलीच भंबेरी उडाली.
त्याचं झालं असं की, शनिवारी सावळज (ता.तासगाव) परिसरात आढळून आलेला गवा रेडा रविवारी दुपारी डोंगरसोनी येथील एका शेततळ्यात जवळ आला. मग काय भर दुपारी उन्हाने व्याकुळ झालेल्या गव्याने थेट शेततळ्यात उतरून पोहण्याचा आनंद लुटला. येथील स्थानिकांनी हा व्हिडिओ काढून शेअर केल्याने तो चांगलाच व्हायरल होत आहे.
सावळज येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात शनिवारी सकाळी सहाच्या सुमारास गवा आढळून आला होता. ग्रामस्थांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला. दरम्यानच्या काळात गवा रेडा गावात घुसण्याचा प्रयत्न करीत होता. अखेर वनविभाग आणि ग्रामस्थांना या गव्यास हुसकावून लावण्यात यश आले.
यानंतर रविवारी दुपारी डोंगरसोनी ते तिसंगी रस्त्यावरील लोहार मळ्यात मोहन झांबरे यांच्या शेततळ्यात हा गवा स्विमिंग करताना आढळला. स्थानिक ग्रामस्थांनी तिथे गर्दी केल्यानंतर सदर गव्याने तेथून धूम ठोकली.
हेही वाचा :