

अहमदाबाद, वृत्तसंस्था : अहमदाबाद कसोटी अनिर्णितेच्या दिशेने जात होती, पण राहुल द्रविडचा श्वास थांबला होता. राहुल द्रविड अस्वस्थ झाला, त्याला धक्का बसला होता. त्याची कानशिले गरम झाली होती, याचा खुलासा खुद्द टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाने केला आहे. अहमदाबाद कसोटी अनिर्णीत राहिल्यानंतर राहुल द्रविडने स्टार स्पोर्टस्शी बोलताना सांगितले की, सामन्यादरम्यान त्याचे लक्ष न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील ख्राईस्टचर्चमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर होते. न्यूझीलंडने हा सामना दोन गडी राखून जिंकला. शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडने विजय मिळवला आणि या सामन्याने सर्वांचे श्वास रोखून धरले.
राहुल द्रविडही ड्रेसिंग रूममध्ये हाच सामना पाहत होता आणि याला कारण होते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे तिकीट. खरे तर टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंड आणि श्रीलंकेत फक्त ड्रॉची गरज होती, पण यजमान किवी संघाने विजयाच्या दिशेने पावले टाकली. क्षणभर असे वाटले की हा सामनाही श्रीलंकेला जिंकता येईल आणि त्यामुळेच राहुल द्रविड अहमदाबादच्या ड्रेसिंग रूममध्ये अस्वस्थ होत होता.
अहमदाबाद कसोटीनंतर राहुल द्रविड म्हणाला, ब्रेक दरम्यान आम्ही न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील सामना पाहत होतो. जेव्हा न्यूझीलंड विजयाच्या दिशेने जात होता आणि त्याच्या 2-3 विकेटस् पडल्या तेव्हा आम्ही म्हणत होतो की, हे न्यूझीलंड काय करत आहे? त्यावेळी आम्ही घाबरलो होतो. तू एवढे मोठे फटके का मारत आहेस केन, असे मी ड्रेसिंग रूममध्ये ओरडत होतो, पण त्याचा इरादा मात्र वेगळाच होता आणि ड्रॉ ऐवजी त्याने थेट श्रीलंकेला पराभूत करत आम्हाला कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचवले. जतीन सप्रू, संजय मांजरेकर आणि संजय बांगर यांच्याशी संवाद साधताना त्याने हा किस्सा सांगितला.