Latest

संशयकल्लोळ! ‘गॅस लायटिंग’ला लाईटली घेऊ नका

मोहन कारंडे

जोडपे समोर बसले होते आणि दोघेही एकमेकांवर आरोप करत होते… नवरा म्हणत होता, ही माझ्यावर संशय घेते. माझे बाहेर काहीतरी अफेअर चालू आहे आणि सतत मला टोचून बोलून माझा मानसिक छळ करते. तिचे म्हणणे होते, याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. हा खोटे बोलतोय आणि तो बाहेर कोणात तरी गुंतलेला आहे, हे मला निश्चित माहिती आहे. त्यावर नवरा उसळून म्हणाला, हिचा संशय दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. तिच्या मनावरचा ताबा देखील सुटत चाललेला आहे. म्हणूनच ती अशी संशय घेतेय. ती हल्ली बडबडत असते आणि तिचे कामातही लक्ष नसते. म्हणूनच मी तिला डॉक्टरला दाखवून घ्यावे म्हटले. जेव्हा मी दोघांचेही म्हणणे ऐकले आणि बायकोला पुरावा कोणता आहे हे विचारले, तेव्हा तिने काही फोनवरच्या क्लिप्स मला ऐकवल्या. त्या नवर्‍याने ऐकल्यावर तो म्हणाला, मी 'तिच्या'शी बोलतो ते केवळ मैत्रीण म्हणून बोलतो आणि हे सगळे चेष्टेत मी बोलत असतो.

गॅस लायटिंग!

नवर्‍याचे अशा पद्धतीने बायकोला फसविणे किंवा तीच कशी मानसिक रुग्ण झाली आहे असे भासवणे याला गॅस लायटिंग असे म्हणतात. जेव्हा जोडप्यांमध्ये आपल्या जोडीदाराला फसवून काहीतरी गोष्ट साध्य करायची असते. पण ती फसवणूक उघडकीला येऊ नये म्हणून जोडीदारालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा गॅस लायटिंग काम करत असते. ही एक नात्यामधील फसवणुकीची पद्धत असते. जर यातून वाद टोकाला गेले तर आत्महत्या किंवा खुनापर्यंत मजल जाते. बहुसंख्य नवरा-बायकोच्या नात्यांमध्ये सुरुवातीच्या काळात सुसंवाद असतो. पण जसजसे मतभेद वाढत जातात आणि वाद होऊ लागतात तसतसे एकमेकांवर आरोप सुरू होतात. अशावेळी दोघेही एकमेकांना वाईट रंगविण्याचे काम सुरू करतात. जेव्हा हे रंगविणे काम करत नाही तेव्हा सरळ सरळ खोटे आरोप केले जातात आणि ते खरेच आहेत असे सिद्ध करण्यासाठी पुरावे 'निर्माण केले' जातात.

लो सेल्फ एस्टीम!

एका केसमध्ये नवरा बायकोला दिसेल अशा पद्धतीने किचनमधला गॅस बर्नर पेटता ठेवून तिला सांगू लागला की, तिनेच तो बर्नर कसा चालू ठेवलेला आहे. काही वेळा रात्री बाथरूममधला बल्ब चालू ठेवणे, चपला गायब करणे इत्यादी अनेक प्रकारे जोडीदारानेच ते केले आहे असे खोटे सांगितले जाते. मग ती मानसिकदृष्ट्या बिघडलेली असल्यामुळे तिच्याकडून अशी कृत्ये घडू लागलेली आहेत, असे भासविणे सुरू होते. तिलाही क्षणभर खरे वाटते. पण नंतर तिच्या लक्षात येते की, तिने असे केलेले नाही. जर ती या गोंधळात सापडली तर तिला ताण किंवा स्ट्रेस येऊ लागतो आणि त्याचे रूपांतर नंतर निराशा विकृती किंवा डिप्रेशन, काळजी विकृती, इ. रोगात होऊ लागते. कारण जी व्यक्ती या सापळ्यात अडकते, त्या व्यक्तीला असे वाटत राहते की, आपण कमी अकलेचे आहोत किंवा आपल्याला काही कळत नाही आणि असा समज जोडीदाराचा व इतर नातेवाईकांचा झालेला आहे. मग स्वतःलाच दोष देत कमीपणा वाटू लागतो. याला 'लो सेल्फ एस्टीम' असे म्हणतात. जेव्हा स्वतःबद्दलचाच आदर हा कमी होतो तेव्हा मनात काळजी घर करते आणि नंतर दीर्घ काळाने त्याचे रूपांतर काळजी विकृतीत होते.

कौन्सिलिंगची गरज!

आपल्या इथे सासू आणि सून यांच्यातला विसंवाद जगजाहीर आहे. सासू अशावेळी काही जर गॅस लायटिंगचे प्रकार करू लागली तर सुनेला ताण येऊन तिला डिप्रेशन निर्माण होऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या अनेक केसेस माझ्याकडे रिपोर्ट झालेल्या आहेत. बर्‍याच वेळा अशा गॅस लायटिंगने त्रस्त असलेल्या स्त्रियांना व क्वचित पुरुषांना औषधोपचारसुद्धा सुरू केले गेलेले आहेत. वास्तवात त्यांना कौन्सिलिंगची तीव्र गरज असते.

मुद्दामहून पुरावे निर्माण करून छळ करणार्‍या अशा नातेसंबंधातून अनेक गुन्हे घडले आहेत आणि त्याचे दुष्परिणाम भयावह आहेत. घराघरांमध्ये लग्न करून बाहेरून आलेल्या स्त्रियांना या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागतो. खुद्द आपला जोडीदारच जर असे प्रकार करू लागला तर मात्र त्या उद्ध्वस्त होतात. काही केसेसमध्ये पुरुषांनाही याची झळ बसलेली आहे, जिथे स्त्रियांनी हे प्रकार केलेले आहेत. जर ही फसवणूक आहे तर त्याचे दुष्परिणाम तर होणारच. म्हणूनच गॅस लायटिंग हा प्रकार लाईटली घेऊ नये. ज्यांना असे वाटते की, आपल्याला खोटे पुरावे घेऊन नाहक छळले जाते आहे त्यांनी तत्काळ कौन्सिलिंग करून घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT