पुढारी ऑनलाईन: पंजाब पोलिसांकडून बनावट चकमक होण्याची शंका आल्याने गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच तिहारमधील तुरुंग अधिकाऱ्यांना सुरक्षिततेची खात्री करण्याचे निर्देश द्यावेत. आपल्याला पोलिसांकडे सोपवण्यापूर्वी वकिलांना माहिती द्यावी अशी मागणी या याचिकेत केली आहे. तसेच इतर कोणत्याही राज्याच्या पोलिस दलाच्या ताब्यात देण्यापूर्वी त्याच्या वकिलांना माहिती द्यावी, अशी विनंती देखील केली आहे.
दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंदिस्त असलेल्या बिश्नोईने आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, पंजाब पोलीस आपली कोठडी मागू शकतात आणि नंतर बनावट चकमकीत ठार मारू शकतात. गेल्या आठवड्यात गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर त्यांना राजकीय फायदा मिळेल, असे देखील याचिकेत म्हटले आहे.
याचिकेत म्हटले आहे की, "कथित आरोपीला सत्य आणि निःपक्ष चौकशीबरोबर निःपक्ष सुनावणीचा हक्क आहे. फिर्यादीकडून गुन्ह्याच्या खटल्यांमध्ये संतुलित भूमिका बजावण्याची अपेक्षा केली जाते. तपास हा विवेकपूर्ण, निःपक्षपाती, पारदर्शक आणि वेगवान असावा. आणि तपास अधिकारी कोणत्याही आरोपी व्यक्तीच्या जीविताच्या सुरक्षेची खात्री करतील."
गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला (२८) यांची गेल्या आठवड्यात त्यांच्या स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकलमधून (एसयूव्ही) प्रवास करत असताना हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येत बिश्नोई टोळीचा हात होता आणि कॅनडाचा गँगस्टर गोल्डी ब्रारने जबाबदारी घेतल्याचे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. ब्रार हे बिश्नोई यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. विशाल चोप्रा अँड असोसिएट्स यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.