Gauri Puja pudhari photo
गणेशोत्सव

Gauri Puja celebration : माहेरवाशिणी आज भरणार ओवसा सोनपावली गौराईचे आगमन

बाजारपेठेत खरेदीची लगबग; भाज्या, फळे, पूजा साहित्यासह ओवशाच्या वाणासाठी महिलांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

ठाणे : सोनपावली गौराईचे गुरुवारी घराघरांत आगमन होताच ठाण्यातील बाजारपेठांनाही गौरी पूजनाचा रंग चढला. गौरीच्या नैवेद्यासाठी हंगामी भाज्या, फळे, नारळ, विड्याची पाने यांसह पूजेचे साहित्य घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली. गौरीच्या शृंगारासाठी साड्या, फुले, गजरे आणि दागिने, तर ओवसा भरण्यासाठी लागणारे वाण घेण्यासाठीही दिवसभर खरेदी सुरू होती. त्यामुळे बाजारपेठेत गौरीच्या खरेदीची आणि सणाची लगबग एकाचवेळी दिसून आली.

गौराईच्या नैवेद्यात हंगामी भाज्यांना विशेष महत्त्व असल्याने पडवळ, गवार, चवळीच्या शेंगा, भेंडी, कारले, दोडका, दुधी भोपळा, वांगी, भोपळा आणि अळू यांची खरेदी करण्यात आली. घरच्या परंपरेनुसार काही ठिकाणी विविध भाज्यांची एकत्र भाजी, तर काही घरांत प्रत्येक भाजी स्वतंत्रपणे केली जाते. यासोबत पुरणपोळी, खीर, लाडू, करंजी आदी गोड पदार्थांच्या तयारीसाठी आवश्यक साहित्यही खरेदी करण्यात आले. फळे, नारळ आणि पूजेच्या साहित्याच्या दुकानांमध्येही ग्राहकांची वर्दळ होती.

गौरीच्या पूजेइतकेच तिच्या शृंगारालाही महत्त्व असल्याने साडी, दागिने, फुले आणि गजऱ्यांची खरेदीही करण्यात आली. घरच्या परंपरेनुसार गौराईला साडी नेसवून पारंपरिक दागिन्यांनी सजविले जाते.

काही कुटुंबांत वर्षानुवर्षे जपून ठेवलेले पारंपरिक दागिने गौराईच्या शृंगारासाठी वापरले जातात. त्यामुळे गौरीच्या आगमनाच्या निमित्ताने ठाण्यातील फुलविक्रेते, साडी-दागिन्यांची दुकाने आणि पूजेच्या साहित्याच्या विक्रेत्यांकडेही ग्राहकांची ये-जा दिसून आली. गौरी पूजनासोबत अनेक कुटुंबांमध्ये ओवसा भरण्याची परंपरा असल्याने त्यासाठीच्या वाणाचीही गुरुवारी खरेदी झाली.

विशेषतः रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्याशी जोडलेल्या ठाण्यातील कुटुंबांमध्ये ओवशाला विशेष महत्त्व आहे. गौरी पूर्व नक्षत्रात आल्यास लग्नानंतर नववधूचा पहिला ओवसा करण्याची पद्धत काही कुटुंबांत आहे. सुपात पाच प्रकारची पाने, पाच फळे, रानभाज्या, सौभाग्यलेणी, धान्य किंवा सुकामेवा ठेवून गौरीची ओटी भरली जाते. हा ओवसा माहेरच्या आणि सासरच्या ज्येष्ठांना देऊन त्यांच्याकडून वाण घेण्याची परंपरा आजही ठाण्यातील अनेक कुटुंबांत जपली जात आहे.

नववधूचा ‘पहिला ओवसा’ खास

बांबूच्या सुपाला हळद-कुंकू लावून त्यात पाने, फळे, रानभाज्या, सौभाग्यलेणी, धान्य किंवा सुकामेवा ठेवला जातो. काही कुटुंबांत पाच, तर काही ठिकाणी दहा सुपांचा ओवसा भरला जातो. विड्याचे पान, तांदूळ आणि नारळ ठेवून गौरीची ओटी भरल्यानंतर हे वाण माहेरच्या आणि सासरच्या ज्येष्ठांना दिले जाते. लग्नानंतर नववधूचा पहिला ओवसा हा या परंपरेतील विशेष क्षण मानला जातो. गौरीला आदिशक्तीचे रूप मानून तिचे सामर्थ्य, सौभाग्य आणि मांगल्य घरातील मुली-सुनेला लाभावे, या भावनेतून हा विधी केला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT