नागपूर महानगरपालिका File Photo
गणेशोत्सव

Nagpur Ganesh Visarjan | अनंत चतुर्दशीसाठी मनपाची जय्यत तयारी; ४४७ कृत्रिम विसर्जन कुंड सज्ज

Anant Chaturdashi artificial immersion tanks | नागपूर शहरातील २२५ ठिकाणी व्यवस्था; १ हजार स्वच्छता कर्मचारी तैनात, १८ निर्माल्य रथांची सेवा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - दहा-बारा दिवसांपासून घराघरांत विराजमान असलेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेने व्यापक तयारी केली आहे.

शहरातील जलस्रोतांचे प्रदूषण टाळण्यासाठी २२५ ठिकाणी तब्बल ४४७ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळी नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी बॅरिकेडिंग, सुरक्षा व्यवस्था, विद्युत प्रकाश, जलतरणपटू आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापौरांकडून विसर्जनस्थळांची पाहणी

महापौर निता ठाकरे यांनी बुधवारी (२३ सप्टेंबर) सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, पोलीस लाईन टाकळी, कोराडी तलाव, सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविसा आणि नाईक तलाव परिसरातील कृत्रिम विसर्जन कुंडांच्या व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपीन, अतिरिक्त आयुक्त अंकित, वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांच्यासह विविध झोनचे सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.पाहणीदरम्यान महापौरांनी विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. विसर्जनस्थळी योग्य बॅरिकेडिंग, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था, पाण्याची व्यवस्था आणि जलतरणपटूंची नियुक्ती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आयुक्त डॉ. विपीन यांनी विसर्जनस्थळी उपद्रव शोध पथकाचे जवान तसेच पोलीस अधिकारी तैनात करण्याच्या सूचना दिल्या.

नवव्या दिवशी २,२८६ मूर्तींचे विसर्जन

गणेशोत्सवाच्या नवव्या दिवशी मनपाने तयार केलेल्या ४९ ठिकाणच्या १३७ कृत्रिम तलावांमध्ये २ हजार २८६ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात २ हजार १२४ मातीच्या तर १६२ पीओपीच्या मूर्तींचा समावेश आहे.

कृत्रिम तलावांची माहिती एका क्लिकवर

नागरिकांना घराजवळील कृत्रिम तलाव किंवा विसर्जनस्थळाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मनपाने विशेष संकेतस्थळ आणि क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर झोननिहाय कृत्रिम तलावांची माहिती तसेच संबंधित ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅपचे दिशादर्शक नेव्हिगेशन उपलब्ध होणार आहे. ही सुविधा मनपाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१८ निर्माल्य रथांद्वारे संकलन

पर्यावरणपूरक गणेशोत्सवांतर्गत विसर्जनानंतर जमा होणाऱ्या निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये १८ निर्माल्य रथ कार्यरत असून, सार्वजनिक गणेश मंडळांकडून निर्माल्य संकलित केले जात आहे. संकलित निर्माल्य भांडेवाडी येथील प्रकल्पात नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. निर्माल्य रथासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी मनपाने १८०० २६७७ ९६६ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे.

स्वच्छतेसाठी १ हजार कर्मचारी तैनात

विसर्जनादरम्यान शहरात चोख स्वच्छता राखण्यासाठी मनपाच्या दहाही झोनमध्ये १ हजार स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT