Dombivli Ganeshotsav pudhari photo
गणेशोत्सव

Dombivli Ganeshotsav : डोंबिवलीच्या टिळकनगर बाप्पाला ८६ पदार्थांचा अन्नकोट

७७ व्या वर्षी भक्तांचा विक्रमी प्रतिसाद; गोडधोड मोदकांसह खमंग पदार्थांचा दरवळ

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या यंदाच्या गणेशोत्सवात भक्ती आणि अन्नदानाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. मंडळातर्फे सालाबाद-प्रमाणे यावर्षीही बाप्पाच्या नैवेद्यासाठी भव्य अन्नकोटाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या अन्नकोटाने तर सर्व रेकॉर्डच मोडले.

मंडळाच्या गणेशोत्सवाचे हे ७७ वे वर्ष असून या ऐतिहासिक वर्षाचे औचित्य साधून मंडळाने ७७ गोड किंवा तिखट पदार्थांचा अन्नकोट करण्याचा संकल्प केला होता. यासाठी टिळकनगरवासीयांना आवाहन करण्यात आले होते. मात्र भाविकांचा उत्साह इतका ओसंडून वाहत होता की ७७ च्या लक्ष्याऐवजी तब्बल ८६ विविध पदार्थ बाप्पाच्या चरणी अर्पण झाले.

मंगळवारी संध्याकाळी या अन्नकोटाचे आयोजन करण्यात आले होते. या अन्नकोटाची मांडणी अत्यंत आकर्षक पद्धतीने करण्यात आली होती. फुलांच्या पाकळ्यांनी सजवलेल्या टेबलवर आठ वेगवेगळ्या विभागात या ८६ पदार्थांची मांडणी करण्यात आली होती, ज्याने पाहणाऱ्यांचे डोळे दीपून गेले. यामध्ये खजूर, पान, चॉकलेट, उपवासाचे असे तब्बल ८ प्रकारचे मोदक होते.

पेढा, लाडू, काजू कतली अशा २९ विविध प्रकारचे गोड पदार्थ, पाटोळे, फेण्या, करंजी, नारळी भात असे १० प्रकारचे खास पारंपरिक महाराष्ट्रीयन गोड आणि तिखट पदार्थ, दाबेली, बाकरवडी, कोथिंबीर वडी, चिवडे, समोसे असे १५ प्रकारचे तिखट आणि खमंग पदार्थ, ढोकळा आणि इडलीचे ६ खमंग प्रकार, उपवासाचे ३ खास पदार्थ, आमरस, खजूर केक, रवा केक, पास्ता असे ६ हटके पदार्थ आणि ३ प्रकारचे लाडू आणि खायच्या पानासह इतर ६ पदार्थांचा या अन्नकोटात समावेश होता. रात्री १० वाजेपर्यंत हा देखणा आणि चविष्ट अन्नकोट पाहण्यासाठी भाविकांनी यावेळी अक्षरशः गर्दी केली होती.

बाप्पाच्या दर्शनाला अन्नकोटामुळे गोडी

बाप्पाच्या दर्शनाला एक वेगळीच गोडी या अन्नकोटामुळे आली होती. त्यानंतर साडेदहा वाजल्यानंतर बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविकांना अन्नकोटातील हेच पदार्थ प्रसाद म्हणून वाटण्यात आले, ज्यामुळे प्रसादाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. या संपूर्ण उपक्रमाला परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल या उपक्रमाची जबाबदारी अत्यंत सुंदररीत्या पार पाडणाऱ्या गार्गी भावे, मानसी केतकर आणि श्रेया तिम्मापूर यांनी सर्व भाविकांचे मनापासून आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT