खोपोली, डोंगरकडा कोसळून उद्ध्वस्त झालेल्या इर्शाळवाडीतील दुर्घटनेत (Irshalwadi landslide) मृत पावलेल्यांचा सामूहिक दशक्रिया आणि उत्तरकार्य विधी शासकीय इतमामात आज (दि.28) नम्राचीवाडी येथे करण्यात आले. यावेळी मृतांचे नातेवाईक, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर नाभिक बांधवांनी पुढाकार घेत विनामूल्य मुंडन केले.
इर्शाळवाडी (Irshalwadi landslide) येथे 19 जुलैरोजी रात्री दरड कोसळल्याने अनेक माणसं, चिमुकली ढिगा-याखाली गाडली गेली. निसर्गाच्या सानिध्यात असलेले गाव एका क्षणात होत्याच नव्हते झाले. डोळ्यादेखत आपली आई, मुलगा, वडील ढिगाऱ्याखाली गाडले गेले. काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आणि नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा आणि किंचाळ्यांनी इर्शाळवाडीचा आसमंत सुन्न झाला होता. मदत कार्य सुरु असताना आपले आई- वडील यामध्ये जिवंत असतील का ? या विवंचनेतून बचावलेले लोक ढिगाऱ्याकडे टक लावून पाहत होते. ढिगाऱ्याखालून 27 मृतदेह बाहेर कढले. अद्यापही 57 जण बेपत्ता आहेत. सुदैवाने 141 बचावलेल्यांमध्ये लहान मुलं, महिला, अबालवृध्दांचा समावेश आहे. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
दुर्घटनेतील मृतांचा सामूहिक दशक्रिया आणि उत्तरकार्य विधी शासकीय इतमामात आज करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रातांधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, नायब तहसिलदार सुधाकर राठोड, उपपोलिस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, जि. प. सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी पं.स.उपसभापती शाम साळवी, चौक सरपंच रितू ठोंबरे, सदस्य निखिल मालुसरे, युवासेना उपजिल्हा आधिकारी निखिल पाटील, चिटणीस प्रशांत खांडेकर, तालुका अधिकारी महेश पाटील, नितीन तवले, मंगेश पाटील, सचिन मते, गणेश मोरे, नैना घीगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश केवारी, विनोद भोईर, प्रसाद चौधरी, राजन गावडे, राजेश पाटील, महादेव पिरकड, विष्णू खैर, गणेश कदम आदी उपस्थित होते.
हेही वाचा