Latest

पंढरपूर : बाबा IPS, मी PSI असल्याचे सांगत तरुणीला इम्प्रेस करणाऱ्या भामट्याला ओरिजनल ‘बेड्या’

backup backup

पंढरपूर ; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर शहरातील एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत असताना आरोपीने आपण स्वत: पीएसआय आहे. तर माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत. असे खोटे सांगून तरुणीला तुला पोलीस भरतीसाठी मदत करतो. असे आमिष दाखवून त्या मुलीशी व तिच्या घरातील लोकांशी संपर्क वाढवला. मुलीला खरे वाटावे म्हणून तो गणवेशात येत असे. वारंवार वेगवेगळया अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे सांगून मुलीला व तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले.

मात्र, मुलीला आरोपीच्या वागण्याबाबत शंका आली. तिने चौकशी केली असता तो फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच मुलीने थेट शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. आणि पोलीसांकडून या तोतया पीएसआयचा भांडाफोड झाला. रमेश सुरेश भोसले-भिसे (वय २२, रा. यलम्मा मंदिरा जवळ, आंबे ता.पंढरपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपी रमेश भोसले याने आपण खरोखरच पीएसआय असल्याचे भासवण्याठी खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तूल आदी साहित्य सोलापूर येथून आणले. पोलीस अधिकारी असल्याचे बनावट पोलीस ओळखपत्र व बनावट आधारकार्ड देखील तयार करुन घेवून त्याचा उपयोग त्याने मुलीची व तिचे घरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी केला.

पंढरपूर : मंगळवेढा पोलीस ठाणे येथे पीएसआय म्हणून कार्यरत असल्याचा बनाव

आपण मंगळवेढा पोलीस ठाणे येथे पीएसआय म्हणून कार्यरत असल्याचे सांगीतले. सदर मुलगी व तिच्या घरच्यांचा विश्वास संपादन करून विवाह करण्यासाठी वारंवार तगादा लावला होता. तो गेली सहा महिन्यापासून पीडित मुलगी व त्याचे घरच्यांच्या संपर्कात होता. परंतु सदर मुलीला आरोपीच्या वागण्याचा संशय आल्याने मुलीने मंगळवेढा पोलीस ठाणे व पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे चौकशी करुन खात्री केली.

रमेश सुरेश भोसले या नावाचे कोणीही अधिकारी या दोन्ही पोलीस ठाण्यात अधिकारी म्हणून कार्यरत नसल्याची माहिती प्राप्त झाली. तेव्हा आपली फसवणूक होत असल्याचे या मुलीच्या लक्षात आल्यावर या मुलीने निर्भया पथक पंढरपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला.

निर्भया पथकाने केला पर्दाफाश

निर्भया पथकाच्या पोलीसांनी खात्री करण्यासाठी त्या मुलीस आरोपी रमेश सुरेश भोसले-भिसे यास बोलावून घेवून त्याच्या सोबत बोलण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे मुलीने आरोपीस बोलावून घेवून त्याचे सोबत बोलणे चालू ठेवले. इतक्यात निर्भया पथकातील पोलीसांनी आरोपी रमेश सुरेश भोसले भिसे यास ताब्यात घेवून खात्री केली. तेव्हा त्याच्याकडे असलेल्या सॅकमध्ये खाकी रंगाचा पोलीसांचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तोल, बनावट पोलीस ओळखपत्र, आधारकार्ड मिळून आले.

याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. तर त्याने गुन्ह्याचे कबुलीच दिली. पोलीसांनी त्यास पुढील कायदेशीर कारवाई करणेसाठी ताब्यात घेतले. या झालेल्या फसवणुकीबाबत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी आरोपीस अटक करुन न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT