मुंबई : पुढारी ऑनलाईन; मुंबई आणि उपनगरांत पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर कॉलनीतील एका इमारतीचा काही भाग कोसळला. यात चार जण जखमी झाले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. महादेव खिलारे (वय ५०), सुनीता खिलारे (४२), रोहित खिलारे (२३) आणि वैभव खिलारे (२०) अशी जखमींची नावे आहेत. (Mumbai Rains)
मान्सूनच्या पहिल्या मुसळधार पावसानंतर उपनगरात दोन इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विलेपार्ले गावठाणात दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला तर तीन जणांना वाचवण्यात यश आले. घाटकोपर पूर्वेकडील राजावाडी कॉलनीमध्ये आणखी एक घटना घडली, जिथे ३ जणांना वाचवण्यात यश आले. पण तीन मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन रहिवासी अडकले. रविवारी रात्री उशिरापर्यंत अडकलेल्या दोघांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
सोमवारी सकाळी मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर राजावाडी कॉलनीमध्ये बचावकार्य पूर्ण झाले आहे. सुमारे २३ तासांच्या बचावकार्यानंतर दोन बेपत्ता लोकांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. रविवारी सकाळी ९.३० वाजता घाटकोपर पूर्वेकडील चित्तरंजन नगर येथील राजावाडी कॉलनीमध्ये तळमजल्यासह तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. यात इमारतीचा तळ मजला, स्टिल्ट पार्किंग आणि पहिल्या मजल्याचे मोठे नुकसान झाले. मुंबई अग्निशमन दल (MFB) आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. (Mumbai Rains)
ठाणे भागातही संततधार पाऊस सुरु आहे. ठाणे पश्चिमेतील वर्तक नगर भागात विवियाना मॉलच्या मागे ४० फूट लांबीची भिंत कोसळली. यात कोणतीही दुखापत झाली नसल्याचे ठाणे महानगरपालिकेने म्हटले आहे.
मुंबई शहरात गेल्या २४ तासांत ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर पूर्व उपनगरांत ५४ मिमी आणि पश्चिम उपनगरात ५९ मिमी पाऊस पडला आहे. मुंबई आणि उपनगरांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
पुढील पाच दिवसांमध्ये मुंबईसह कोकण तसेच राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सूनने राज्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार आणि मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. परिणामी पश्चिम घाट पर्वतरांगा, कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे, असे प्रादेशिक हवामान विभागाच्या (आयएमडी) मुंबईतील अधिकारी सुषमा नायर यांनी रविवारी सांगितले.
हे ही वाचा :