Brendan Taylor : ‘भारतीय उद्योजकाने स्पॉट फिक्सिंगसाठी केले ब्लॅकमेल!’ 
Latest

Brendan Taylor : ‘स्पॉट फिक्सिंगसाठी भारतीय उद्योजकाने ब्लॅकमेल केले!’

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेंडन टेलरने (Brendan Taylor) धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे. स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी होण्यासाठी एका भारतीय व्यावसायिकाने त्याच्याशी संपर्क साधला होता, असे टेलरने म्हटले आहे. या घटनेचा उल्लेख करण्यासाठी ब्रेंडन टेलरने ट्विटरवर एक लांबलचक पोस्टही शेअर केली आहे.

टेलरने (Brendan Taylor) आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आयसीसीला या प्रकारणाबाबत सांगण्यास उशीर झाला. आता मला अनेक वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागू शकते. परंतु मी यासाठी तयार आहे. भारतीय उद्योगपतीला भेटताना माझा भ्रमनिरास झाला होता. त्यावेळी मी ड्रग्जचे सेवन केले होते. या संपूर्ण घटनेने माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला.

टेलरने 'त्या' घटनेचा केला उल्लेख….

टेलरने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'या सगळ्याचा विचार करून मी भारतात गेलो. त्या उद्योजकाची भेट घेऊन चर्चा केली. आम्ही T20 लीग आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मग हॉटेलमध्ये माझ्या शेवटच्या रात्री, भारतीय उद्योजक आणि त्याच्या सहकाऱ्याने मला एन्जॉय करण्यासाठी आमंत्रित केले. आम्ही मद्य प्राशन केले. यादरम्यान मला खुलेआम कोकेन देण्यात आले. तो स्वतः कोकेनचे सेवन करण्यात मग्न होता. मीही मूर्खासारखा वागलो आणि नशा केली. मी त्या घटनेबद्दल अनेक वेळा पश्चाताप केला आहे आणि त्याने मला कसे फसवले या विचाराने मला आजही वाईट वाटत आहे.'

सहा जण खोलीत घुसले आणि धमकावले…

ब्रेंडन टेलर (Brendan Taylor) पुढे म्हणतो की, 'दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी माझ्या हॉटेलच्या खोलीत घुसले. त्यांनी मला कोकेन घेण्यापूर्वीच्या रात्रीचा व्हिडिओ दाखवला आणि मला धमकावले की, जर मी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांच्यासाठी स्पॉट फिक्सिंग केले नाही तर ते हा व्हिडिओ व्हायरल करतील. माझ्या खोलीत सहा जण घुसले होते आणि मी घाबरलो होतो. मला माझ्या स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी वाटत होती. मी अशा परिस्थितीत होतो ज्याने माझे जीवन बदलून टाकले.'

काम झाल्यावर 20 हजार डॉलर्स देणार होते…

टेलरने म्हणतो, 'त्यावेळी मला 15 हजार डॉलर्स दिले आणि सांगितले की काम पूर्ण झाल्यानंतर आणखी 20 हजार डॉलर्स दिले जातील. मी पैसे घेतले कारण मला कसेतरी भारत सोडून जाता येईल. सहा जण माझ्या खोलीत होते आणि नाही म्हणायची संधी नव्हती. मला तिथून कसंही करून बाहेर पडायचे होते. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा या घटनेने माझ्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाला. मी गोंधळलो होतो. डॉक्टरांनी मला प्रेशर घेण्यास मनाई केली असून माझ्यावर उपचार सुरू आहेत.'

आयसीसीला सांगण्यास चार महिन्यांचा विलंब

'त्या उद्योजकाला माझ्याकडून माझ्या खर्चाचा अहवाल हवा होता, ज्याबद्दल मी त्याला कधीच सांगितले नाही आणि सांगणार नाही. आयसीसीला या घटनेची तक्रार करण्यास मला चार महिने उशीर झाला. मला माहित आहे की इतका वेळ पुरेसा आहे. पण मला सगळ्यांना, विशेषतः माझ्या कुटुंबातील सदस्यांना वाचवायचे होते. चार महिन्यांनंतर मी आयसीसीशी संपर्क साधला. मला वाटले की ते माझ्या अडचणी समजू शकतील, पण तसे झाले नाही. मात्र, मला त्यांच्या कृतीबद्दल वाईट वाटत नाही', असही टेलर (Brendan Taylor) सांगतो.

माझे क्रिकेटवरील प्रेम कोणत्याही धोक्यापेक्षा मोठे आहे…

टेलर म्हणतो की, 'मी ऑन रेकॉर्डवर सांगू इच्छितो की, मी कधीही मॅच फिक्सिंग केलेले नाही. मी खूप असू शकतो, पण फसवणूक करणारा नाही. क्रिकेटच्या या सुंदर खेळावरील माझे प्रेम माझ्या मार्गावर येणाऱ्या कोणत्याही धोक्यापेक्षा जास्त आहे. मला आयसीसीने अनेक मुलाखतींसाठी बोलावले आहे आणि मी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. मी अजूनही अस्वस्थ आहे आणि वाटतं की असं व्हायला नको होतं.'

माझी कथा अनेकांना प्रेरणा देईल अशी आशा आहे…

'आयसीसी माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर अनेक वर्षांसाठी बंदी घालणार आहे. हे मी आदराने स्वीकारतो. मला आशा आहे की माझी कथा अनेक क्रिकेटपटूंना प्रेरणा देईल आणि त्यांना त्यांचे अनुभव सांगण्यास मदत करेल. मला आशा आहे की ते अशा कोणत्याही घटनेची माहिती लवकरात लवकर आयसीसीला देऊ शकतील,' अशी आशाही टेलरने व्यक्त केली आहे.

या घटनेतून सावरण्यासाठी टेलर सध्या पुनर्वसन केंद्रात आहे. तो सांगतो की, 'मला या घटनेबाबत सांगायचे होते कारण मी हे का केले हे लोकांना कळावे अशी माझी इच्छा आहे. मी लवकरच बरा होईन माझ्यामुळे दुखावलेल्या आणि माझ्यामुळे लाज वाटणाऱ्या सर्वांची मला माफी मागायची आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT