पुणे : महाराष्ट्राच्या लोककलेच्या परंपरेतील शिवकालीन मर्दानी खेळाचे नेहमीच कौतुक होताना दिसून येते. सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पेन आणि इटली येथील दोन युवतींना मर्दानी युद्धकलेची 'भुरळ' पडली आहे. या प्रशिक्षणासाठी या दोन्ही युवती पुण्यात दाखल झाल्या आहेत. शिवाजीनगर गावठाण येथील श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा यांच्या सोशल मीडियावर असलेल्या माहितीचा आधार घेत या दोन युवतींनी आखाड्याचे प्रमुख प्रशिक्षक विजय आयवळे-पाटील यांच्याशी संपर्क साधला.
संबंधित बातम्या :
मर्दानी युध्दकलेचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे प्रशिक्षण घेण्यासाठी स्पेन येथून बेला गंधारा आणि इटली येथून अॅना मारा या दोन महिन्यांपूर्वी या आखाड्यात दाखल झाल्या. या दोन्ही युवती प्रामुख्याने नृत्यकलेत पारंगत आहेत. स्वसंरक्षण व शारीरिक तंदुरुस्तीसाठी असे खेळ शिकण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार नियोजन करून त्या पुण्यामध्ये आल्या. आखाड्याचे प्रमुख प्रशिक्षक विजय आयवळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल मोहिते, वैभव मोहोळ, हर्षदा देशमुख, विनायक सुतार आणि जलाल सय्यद यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे.
श्री शिवाजीराजे मर्दानी आखाड्याच्या माध्यमातून गेली 15 वर्षे शिवकालीन मर्दानी युद्धकलेचे प्रशिक्षण देत आहोत. सध्या या आखाड्यामध्ये जवळपास 100 विद्यार्थी-विद्यार्थिनी मर्दानी खेळाचा सराव करीत असतात. यामध्ये प्रामुख्याने परंपरागत खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. या कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा व आपल्या पूर्वजांचा इतिहास जतन केला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– विजय आयवळे-पाटील, मुख्य प्रशिक्षक, श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा.