Latest

आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ लवकरच होणार खाऊगल्ली; महापालिका आयुक्त पाटील यांची मान्यता

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

इंदूर शहराच्या धर्तीवर आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळील जागेत खाद्यपदार्थ केंद्र म्हणजे खाऊ गल्ली तयार करण्यात येणार आहे. तेथे विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या टपर्‍या लावल्या जातील. त्यासाठी 6 कोटी रुपये खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मान्यता दिली.

पालिकेच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पात शहरातील विविध ठिकाणी खाऊ गल्ली सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आकुर्डी रेल्वे स्थानक येथे शहरातील पहिली खाऊ गल्ली विकसित करण्यात येणार आहे. तेथे स्वच्छतेसह बसण्यासाठी आसन व्यवस्था, पिण्याचे स्वच्छ पाणी व प्रकाशव्यवस्था असणार आहे.

शहरातील अनधिकृत नळजोडणी नियमित करण्यासाठी दंड भरून अभय योजना आखण्यात आली आहे. त्यास आयुक्तांनी मंजुरी दिली.
चर्‍होलीमधील अ‍ॅमेनिटी स्पेसमध्ये इलेक्ट्रिक पीएमपीएल बस चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक व्हेईकल स्टेशन उभारण्यासाठी 13 कोटी 40 लाख खर्च आहे. सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकार्‍यांच्या प्रशासकीय व वित्तीय अधिकारांमध्ये वाढ करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या कार्यालयासाठी साहित्यिक उपक्रमासाठी करारनामा करून जागा देण्यास प्रशासक पाटील यांनी मान्यता दिली.

प्रभाग 10 आणि प्रभाग 25 मधील ड्रेनेजलाइन सुधारणा विषयक कामासाठी 38 लाख 35 हजार खर्च आहे. पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ऑपरेशन थिएटरसाठी आवश्यक 12 मशिनच्या खरेदीसाठी 63 लाख 91 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. निगडीतील भक्ती-शक्ती समूह चौक ते निसर्ग दर्शन सोसायटी पर्यंतच्या रस्त्याच्या स्थापत्य विषयक कामासाठी 1 कोटी 9 लाख 40 हजार खर्च आहे.

महापालिकेतील ब, क वर्गातील रिक्त पदे भरणार

महापालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट ब व क वर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाइन परीक्षेचे कामकाज करण्यासाठी टीसीएस या संस्थेची नियुक्ती करण्यास आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT