खैबर जिल्ह्यातील जमरूद येथे मतदान केंद्राबाहेर लागलेली रांग. 
Latest

Pakistan, General election : पाकिस्‍तानमध्‍ये मतदानावेळी दहशतवादी हल्‍ला, चार पोलिसांसह पाच ठार

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमध्‍ये आज (दि. ८) मतदान प्रक्रिया सुरु आहे. विविध ठिकाणी झालेल्‍या हिंसाचारात आतापर्यंत ५ जण ठार झाल्‍याचे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. मतदानाच्‍या पार्‍श्वभूमीवर देशातील मोबाईल फोन सेवा तात्‍पुरती बंद ठेवण्‍यात आली आहे. मतदानाच्‍या एक दिवस आधी म्‍हणजे बुधवारी दक्षिण-पश्चिम प्रांत बलुचिस्तानमध्ये निवडणूक उमेदवारांच्या कार्यालयाजवळ झालेल्या दोन स्फोटात किमान २६ जण ठार झाले होते.

Pakistan General election : कुलाचीमध्‍ये गोळीबारात चार पोलीस ठार

१६७ राजकीय पक्ष निवडणूक लढवत असून, तब्‍बल ९० हजार ५८२ मतदान केंद्र आहेत. सर्वत्र कडेकोट बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. तसेच इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या होत्या.वायव्येकडील डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील कुलाची भागात दहशतवाद्यांनी  पोलिस गस्ती पथकाला लक्ष्य केले. बॉम्बस्फोट आणि गोळीबारात चार पोलिस ठार झाले, असे स्थानिक पोलिस प्रमुख रऊफ कैसरानी यांनी सांगितले.  देशातील उत्तर भागात सुरक्षा दलाच्या वाहनावर बंदूकधाऱ्यांनी केलेला गोळीबार एक जण ठार झाला. बलुचिस्तानच्या विविध भागांमध्ये ग्रेनेड हल्ले देखील झाले; परंतु कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मतदान प्रभावित झाले नाही, असे मकरन विभागाचे आयुक्त सईद अहमद उमरानी यांनी 'रॉयटर्स'ला सांगितले.


भ्रष्‍टाचार प्रकरणी कारागृहात असणारे पाकिस्‍तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आज सकाळी रावळपिंडी येथील तुरुंगातून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले. या निवडणुकीत मुख्‍य लढत इम्रान खान यांच्या समर्थक उमेदवार आणि नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग पक्षामध्‍ये आहे.

निवडणूक निकाल काही तासांमध्‍ये होणार स्‍पष्‍ट

पाकिस्‍तानचे नवे पंतप्रधान कोण, या प्रश्‍नाचे उत्तर ही निवडणूक देणार आहे. १२८ दशलक्ष मतदार देशातील पुढील सरकार आणि चार प्रांतांमधील विधानसभेचे सत्ताधीशही ठरवणार आहेत. एकूण १२८ दशलक्ष मतदार आहेत. ६९ दशलक्ष पुरुष तर ५९ दशलक्ष महिला मतदार आहेत. २०१८ मधील राष्ट्रीय निवडणुकीत येथे ५२ टक्के मतदान झाले होते, तर १९७१ साली येथे सर्वाधिक ६१ टक्के मतदान झाले होते.देशातील सलग तिसरी सार्वत्रिक निवडणूक असून, ५१२१ उमेदवार रिंगणात आहेत. यातील ४८०६ पुरुष आहेत. तर ३१२ महिला असून २ तृतीयपंथीय आहेत. मतदान प्रक्रिया पार पडल्‍यानंतर तत्‍काळ मतमोजणी सुरू होणार असून, काही तासांमध्‍ये पाकिस्‍तानमधील निवडणूक निकाल स्‍पष्‍ट होणार आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT