सरुड : पुढारी वृत्तसेवा: शिवारे (ता. शाहूवाडी) येथे जनावरांच्या गोठ्यामध्ये घुसून बिबट्याने चार शेळ्या आणि एका बोकडाचा फडशा पाडला. मंगळवारी (ता. १२) पहाटे वारणा उजवा कालवानजीक नाळवा माळरानात ही घटना घडली. या घटनेत आनंदा नामदेव पाटील यांचे सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. आनंदा पाटील यांचा मुलगा सकाळी गोठ्याकडे गेल्यावर ही घटना निदर्शनास आली.
दरम्यान स्थानिक पोलिस पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी वनक्षेत्रपाल अमित भोसले, वनपाल मेहबूब नायकवडी, वनरक्षक आशिष पाटील, वनसेवक रामचंद्र केसरे, विष्णू कुंभार आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरात बिबट्याच्या पाऊलखुणा तसेच बोकडाला फरपटत नेल्याचे जमिनीवरचे ओरखडे आढळून आले. वन पथकाने पंचांसमक्ष घटनेचा पंचनामा केला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई रक्कम लवकर मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, गेल्या आठवड्याभरात कालव्याशी समांतर भेडसगावपैकी निजामवाडी, कापशी, शिवारे अशा तीन ठिकाणी बिबट्याने हल्ला चढवून ६ शेळ्या, १ बोकड, ४ कुत्री ठार मारली आहेत. सहाजिकच वारणा खोऱ्यातील बिबट्याच्या वाढत्या दहशतीमुळे पशुपालन व्यवसायावर पोटपाणी अवलंबून असणारा सामान्य शेतकरी, शेतमजूर वर्ग कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे. नुकसान भरपाईसोबत हल्लेखोर बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तात्काळ पाऊल उचलावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचलंत का?