नगर : संगमनेरात महाविकास आघाडी-भाजपात दुरंगी लढत | पुढारी

नगर : संगमनेरात महाविकास आघाडी-भाजपात दुरंगी लढत

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. नगरसेवक होण्यासाठी अनेकजन गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सध्या तरी संगमनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी दुरंगी लढत होईल, असे चित्र आहे, मात्र महाविकास आघाडी जर स्वतंत्र लढली तर चौरंगी अथवा बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

मागील पंचवार्षिक निवडणुकीत 14 प्रभाग होते, मात्र आत्ताच्या प्रभाग रचनेत 1 प्रभाग वाढल्याने 15 प्रभाग झाले आहेत. या 15 प्रभागातून 30 नगर सेवक निवडले जाणार आहेत. 15 प्रभागातून 53 हजार मतदार 30 नगरसेवकांना निवडून देणार आहेत. प्रभाग क्र. 2 मधून अनुसुचित महिला तर प्रभाग 13 मधून महिला अथवा पुरुष दोन्ही जागा लढविता येणार आहेत. उर्वरीत खुल्या गटातून 14 महिला तर 14 पुरुष असे एकूण 28 सदस्य निवडले जाणार आहेत.

या 30 जागांसाठी 18 ऑगस्टला मतदान होत आहे. इच्छुकांची धावपळ सुरू झाली आहे. उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षांच्या वरिष्ठांकडे आता ते चकरा मारु लागले आहेत.

भाजपला होतीएकमेव जागा

संगमनेर नगरपरिषदेच्या मागील निवडणुकीत 14 प्रभागांसाठी 28 नगरसेवक निवडले होते. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे जनतेतून निवडून आल्या होत्या. 25 नगरसेवक, नगरसेविका सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या होत्या तर राष्ट्रवादीचे इम्राईम देशमुख हे एकमेव नगरसेवक होते. त्यांनी नंतर थोरात गटात प्रवेश केला होता. त्यांना उपनगराध्यपदाची संधी मिळाली होती. शिवसेनेकडून 1 महिला व 1 पुरुष तर भाजपकडून 1 महिला असे अवघे 3 नगरसेवक त्यावेळी भाजप-शिवसेना युतीचे निवडून आले होते, मात्र शिवसेनेचे लखन घोरपडे यांचे जात प्रमाणपत्र बनावट निघाल्याने त्यांचे नगरसेवकांचे पद रद्द झाले होते. शिवसेनेच्या दुसर्‍या नगरसेविका प्रियंका भरितकर यांनी थोरात गटाशी सहमतीचे धोरण स्वीकारले. भाजपच्या मेघाताई भगत या एकमेव विरोधी बाकावर होत्या.

या नगरपरिषदेवर सन 1992 पासून माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या नगरपरिषदेची विकासात्मक वाटचाल सुरू आहे. त्यामुळे संगमनेर शहराचा चेहरा-मोहरा बदलत आहे. गेल्या दोन पंचवार्षिकपासून आ. थोरात यांच्या भगिनी दुर्गाताई तांबे यांनी नगराध्यक्षा पदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली, मात्र यावेळी त्यांना शह देण्यास भाजपने व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. संगमनेरचे मतदार आत्तापर्यंत विकासात्मक कामांना की, भाजप नेत्यांना साथ देतात, हे निवडणूक निकालानंतरच खर्‍या अर्थाने समजणार आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले म्हणून शिवसेनेकडून निवडून आलेल्या एकेमव महिला उमेदवार होत्या. त्याही काँग्रेसच्या गटाला जाऊन मिळाल्याने या नगरपालिकेमध्ये विरोधी भाजपच्या एकच महिला नगरसेविका शिल्लक होत्या. त्या नगरसेविका थोड्याफार प्रमाणात विरोध करीत होत्या, परंतु या विरोधाला सत्ताधारी काँग्रेस फारसे जुमानत नव्हते. त्यात ऐन नगरपालिका निवडणुकीत राज्यात सत्तांतर झाल्यामुळे एकिकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे सर्व जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मिळून लढणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांना मानणारा गट नाही..!

संगमनेरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारा गट नसल्यामुळे भाजप सर्वच्या सर्व 30 जागा स्वबळावर लढविणार आहेत. मतदार नेमके कुणाच्या बाजूने कौल देतात, हे निवडणूक चित्र निकालानंतरच समजणार आहे.

Back to top button