पुणे : अमेरिकेने भारतीय डाळिंबाच्या आयातीवरील बंदी अखेर उठविली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.27) राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रातून एकूण 150 बॉक्समधून 450 किलो डाळिंबाची हवाई वाहतुकीद्वारे अमेरिकेस निर्यात करण्यात आली असून, भविष्यात डाळिंब उत्पादक शेतकर्यांना याचा मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. भारतीय डाळिंबामध्ये किडीचा प्रादुर्भाव आढळल्याने अमेरिकेने 2017-18 पासून भारतीय डाळिंब आयातीवर बंदी घातली होती. ती उठविण्यासाठी केंद्र सरकारची अपेडा संस्था, भारतीय राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संस्था (एनपीपीओ) यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून ही बंदी काही अटी व शर्तीच्या अधिन राहून उठविण्यास यश मिळविले असून, सहा वर्षांनंतरही अमेरिकेस पूर्ववत निर्यात सुरू झाली आहे.
अमेरिकेने डाळिंबाच्या अटी व शर्तीमध्ये माईट वॉश, सोडियम हायपोक्लोराईड प्रक्रिया, वॉशिंग-ड्राईंग आदी प्रक्रिया करून त्यांनी निश्चित केलेल्या मानांकानुसारच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्याचा प्रामुख्याने अंतर्भाव आहे. त्यानुसार केंद्राची अपेडा संस्था, एन.पी.पी.ओ., महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्र आणि आय.एन.आय. फार्म प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने निर्यात झाली आहे. या वेळी अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव, संचालक तरुण बजाज, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक यू. के. वत्स यांच्यासह जे. पी. सिंग, डॉ. मराठे यांच्या उपस्थितीत अपेडाच्या सरव्यवस्थापक विनिता सुधांशू यांनी डाळिंबाच्या निर्यातीच्या कंटेनरला हिरवा झेंडा दाखवला व प्रायोगिक तत्त्वावर 450 किलो डाळिंब विमानाने अमेरिकेतील न्यूयॉर्कला पाठविण्यात आली. या वेळी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, विकिरण सुविधा केंद्र प्रमुख सतीश वाघमोडे, निर्यातदार पंकज खंडेलवाल, सोलापूर डाळिंब संशोधन केंद्राचे डॉ. नीलेश गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.
भारतीय डाळिंबात कर्करोगापासून लढण्यासाठी लागणारे अॅन्टीऑक्सिडंट आहेत. तिथल्या त्वचेच्या विकारांवरील उपचारासाठी असणार्या मार्गदर्शक डाएटमध्ये डाळिंबाचा समावेश आहे. त्यामुळे अमेरिकेतील कॅलिफोर्निया डाळिंबाच्या जातीपेक्षा भारतीय डाळिंबाच्या जातीला जास्त मागणी आहे. या निर्यातीमुळे अमेरिकेतील मोठी बाजारपेठ खुली होत असल्याने डाळिंब उत्पादक शेतकर्यांना भविष्यात फायदा होणार आहे.
– संजय कदम, कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ, पुणे.
अमेरिकन निरीक्षकाच्या उपस्थितीत तपासणी
पणन मंडळाच्या वाशी येथील भाजीपाला प्रक्रिया केंद्रावर डाळिंबाची प्रतवारी करून त्यावर निश्चित केलेल्या प्रणालीनुसार प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डाळिंब तीन किलोच्या बॉक्समध्ये भरून त्यावर सुविधा केंद्रात अमेरिकेच्या निरीक्षक आणि एन.पी.पी.ओ.च्या अधिकार्यांच्या तपासणीअंती संयुक्त मान्यतेनंतर डाळिंबावर विकिरण प्रक्रिया करण्यात आली. एकूण 150 बॉक्सेसमधून 450 किलो डाळिंब हवाईमार्गे पाठविण्यात आल्याचे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी सांगितले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.