ठाणे; पुढारी ऑनलाईन
ठाण्यातील सभेत तलवार म्यानातून बाहेर काढून उंचावल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने मंगळवारी ठाण्यात सभा आयोजित केली होती. या सभेत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना संबोधित केले होते. याआधी सभेच्या व्यासपीठावर राज ठाकरे यांचा ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांनी तलवार भेट देऊन सत्कार केला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी भेट दिलेली तलवार म्यानातून बाहेर काढत उंचावली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
ठाण्यातील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कार्यकर्त्यांनी तलवार दिली होती. ही तलवार राज यांनी म्यानातून बाहेर काढून दाखविली, त्यामुळे नौपाडा पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट प्रमाणे तक्रार दाखल झाली असून गुन्हा दाखल होत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. राज ठाकरे ठाण्यातील सभेत काय बोलले, याचीही तपासणी होणार असल्याचे समजते.
दरम्यान, राज ठाकरे यांना जशाच तसे उत्तर दिले जाणार असून उत्तर पूजेनंतर विसर्जन होते, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. जितेंद्र आव्हाड यांनी सभेच्या जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जाऊन अभिवादन का केले नाही, छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एकमेव वार करणाऱ्याचे मुंडके छाटण्यात आले, त्या कृष्णाजी भास्कर यांचे आडनाव कुलकर्णी हे होते, ते का सांगितले जात नाही, हा इतिहास राज यांना माहित नाही का? असे प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यात उत्तर सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविण्याचे अल्टिमेटम दिले. त्याचसभेत आव्हाड यांच्यावर टीका करीत नागाची उपमा दिली. त्यावर प्रत्युत्तर देताना आव्हाड यांनी मिमिक्री करणाऱ्या राज यांची तुलना जॉनी वॉकर याच्याशी केली. यापुढे ठाकरे यांना तुकाराम महाराज यांच्या वचनानुसार जसाच तसे उत्तर देणार आहोत.
हे ही वाचा :