नवीन कपड्यांमधील विशिष्ट घटक किंवा रसायनांमुळे त्वचेला खाज सुटणे, लाल चट्टे पडणे किंवा दुखणारे पुरळ येऊ शकते. विशेषतः ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह (संवेदनशील) आहे, त्यांना याचा त्रास जास्त होतो.
new clothes wash before wearing
मुंबई : नवीन कपडे खरेदीचा आनंद काही औरच असतो. त्यामुळेच खरेदीनंतर घरी गेल्यावर पिशवीतून काढल्या-काढल्या नवीन कपडे घालण्याचा आनंद द्विगुणित करणाराच ठरतो. मात्र अनेकांचा समज असतो की, कपडे नवीन याचा अर्थ 'स्वच्छ'च असणार. मात्र रसायनांच्या वापरापासून ते कपडे अंगावर घालण्यापर्यंत कपड्याला वेगवेगळ्या टप्प्यांतून जावे लागते. त्यामुळेच चकचकीत दिसणारे नवीन कपडे हे खरोखर 'स्वच्छ' असतातच असं नाही. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी या कपड्यांना मोठा प्रवासाचा टप्पा पार करावा लागतो. त्यामुळेचनवीन कपडे हे धुतल्यानंतरच वापरण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. जाणून घेऊया यामागील कारणे...
कपड्यांच्या उत्पादनादरम्यान त्यावर रंग, फिनिशर्स आणि इतर रसायने वापरली जातात. कपडे घरी आणल्यानंतरही ही रसायने कापडावर तशीच राहू शकतात. त्वचारोगतज्ज्ञांच्या मते, नवीन कपड्यांमधील विशिष्ट घटक किंवा रसायनांमुळे त्वचेला खाज सुटणे, लाल चट्टे पडणे किंवा दुखणारे पुरळ येऊ शकते. विशेषतः ज्यांची त्वचा सेन्सिटिव्ह (संवेदनशील) आहे, त्यांना याचा त्रास जास्त होतो. धुण्यामुळे कापडावरील अतिरिक्त रंग, पृष्ठभागावरील रसायने आणि साचलेली धूळ निघून जाण्यास मदत होते.
खरेदी करताना कपडे जरी स्वच्छ आणि ताजे दिसत असले, तरी त्यात केवळ कापडाचे धागेच नसतात. सुरकुत्या पडू नयेत म्हणून वापरले जाणारे 'फॉर्मल्डिहाइड रेजिन्स' आणि कपड्याला कडकपणा देण्यासाठी वापरले जाणारे 'स्टार्च' यांसारखी रसायने त्यात असू शकतात. अनेकदा कपड्यांना छान वास यावा म्हणून कृत्रिम सुगंधांचा वापर केला जातो, ज्यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. कारखान्यापासून ते शोरूमपर्यंत हे कपडे अनेक हातांमधून जातात. गोदामातील धूळ आणि दमटपणाचाही त्यावर परिणाम झालेला असू शकतो. याव्यतिरिक्त, दुकानातील 'डिस्प्ले'वर असलेले कपडे अनेक लोकांनी परिधान करून (ट्रायल) केलेले असू शकतात. जीवाणू, बुरशी आणि विषाणू कापडावर दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. त्यामुळे, न धुतलेले कपडे हे संसर्गाचे उगमस्थान ठरू शकतात. त्यामुळे, आरोग्याच्या दृष्टीने नवीन कपडे एकदा धुवून मगच वापरणे केव्हाही चांगले!
तज्ज्ञांच्या मते, सर्वच रसायने जरी घातक नसली तरी कपड्यांना दिले जाणारे रंग, विशेषतः पॉलिस्टरसारख्या कपड्यांवरील 'अझो डाईज', त्वचेच्या ॲलर्जीचे मुख्य कारण ठरतात. कपड्यांना सुरकुत्या पडू नयेत म्हणून वापरले जाणारे 'फॉर्मल्डिहाइड' आणि सुती कपड्यांवरील कीटकनाशकांचे अंश यामुळे त्वचेला खाज सुटून लाल पुरळ येऊ शकते. तुमची त्वचा संवेदनशील नसेल, तर कदाचित लगेच काही समस्या जाणवणार नाही. मात्र, तरीही कापडातील रसायने आणि रंगांमुळे त्वचेला खाज सुटणे किंवा ॲलर्जी होण्याचा धोका असतो. विशेषतः डेनिम जीन्स, त्यांचा रंग तुमच्या त्वचेला, इतर कपड्यांना किंवा फर्निचरलाही लागू शकतो. सुरुवातीच्या काही वापरात हे प्रकर्षाने घडते.
तज्ज्ञांच्या मते, नवीन कपडे वापरण्यापूर्वी एकदा धुतल्यास त्यातील जास्तीचा रंग, कृत्रिम सुगंध आणि 'फॉर्मल्डिहाइड' सारखी त्रासदायक रसायने निघून जाण्यास मदत होते. स्पेनमधील रोविरा इ व्हर्जिली विद्यापीठाने २०२२ मध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, केवळ थंड पाण्याने आणि वॉशिंग मशीनच्या एका छोट्या 'सायकल'मध्ये कपडे धुतले तरी त्यातील जवळपास सर्वच घातक फॉर्मल्डिहाइड पूर्णपणे निघून जाते, असे संशोधक जोआकिम रोविरा सोलानो यांनी स्पष्ट केले आहे.
संशोधनानुसार, काही विशिष्ट प्रकारचे कपडे वारंवार वापरल्यामुळे आपल्या शरीराला त्याची ॲलर्जी होऊ शकते, ज्याला 'ॲलर्जिक कॉन्टॅक्ट डर्माटायटिस' म्हणतात. ही एक दुर्मिळ पण त्रासदायक समस्या आहे. यामध्ये कपड्याचा त्वचेशी थोडा जरी संपर्क आला, तरी दोन ते चार दिवसांत शरीरावर खाज, सूज, फोड किंवा जळजळ यांसारखी लक्षणे दिसू लागतात. तज्ज्ञांच्या मते, जर कपड्यांमुळे अंगावर पुरळ उठले तर ते चुकूनही खाजवू नये; कारण खाजवल्यामुळे हा त्रास वाढून त्वचेचा रंग बदलू शकतो किंवा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे नवीन कपडे न धुता वापरणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जरी कपडे धुतल्यामुळे त्यांचा रंग थोडा फिका पडला किंवा कॉलरचा कडकपणा कमी झाला, तरी त्वचेचे रक्षण करणे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे कपड्यांवरील घातक रसायनांपासून वाचण्यासाठी ते धुवून वापरणेच केव्हाही फायदेशीर ठरते.
कपडे धुण्यापूर्वी त्यावरील 'केअर लेबल' अवश्य वाचा. यामुळे कपड्याचे नुकसान टाळता येते.
बहुतेक कापडांसाठी थंड पाणी सुरक्षित असते. यामुळे कपड्यांचा दर्जा टिकून राहतो.
कपडे नैसर्गिक हवेत वाळवणे किंवा ड्रायरमध्ये 'लो हीट' सेटिंग वापरल्याने ते आकुंचन पावत नाहीत किंवा ताणले जात नाहीत.
गडद आणि भडक रंगाचे कपडे सुरुवातीच्या काही वेळा इतर कपड्यांपासून वेगळे धुवावेत, जेणेकरून त्यांचा रंग दुसऱ्या कपड्यांना लागणार नाही.
थेट शरीराच्या संपर्कात न येणारे कपडे उदा. जॅकेट्स, तात्काळ धुण्याची गरज नसते. या कपड्यांवर केवळ ड्रायक्लीन करावे, अशी सूचना असते. असे कपडे घरी धुवू नयेत, कारण त्यामुळे ते खराब होऊ शकतात. स्वेटर दुसऱ्या कपड्यावर घातले जातात, ते देखील सुरक्षित मानले जातात. तरीही हा प्रत्येकाच्या वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे.