Konkan MIDC Pollution : इटलीने बंदी घातलेला घातक रसायन प्रकल्प कोकणात

लोटे एमआयडीसीत ‘फॉरएव्हर केमिकल’चे उत्पादन सुरू
Konkan MIDC Pollution
Konkan MIDC Pollution
Published on
Updated on

जान्हवी पाटील

रत्नागिरी : इटलीमध्ये गंभीर प्रदूषण प्रकरणामुळे बंद पाडलेली आणि न्यायालयीन कारवाईत अडकलेली मिटेनी एस.पी.ए. ही रासायनिक कंपनी भारतात, तेही रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत दाखल झाली असून, कधीही नष्ट न होणारे फॉरएव्हर केमिकलचे उत्पादन गेल्या जूनमध्येच सुरूदेखील झाले आहे.

कधीही नष्ट न होणारे रसायन म्हणजेच ‘फॉरएव्हर केमिकल’ तयार करणार्‍या या इटलीतील कंपनीची संपूर्ण यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंटस् भारतीय कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजच्या एका उपकंपनीने खरेदी केली आणि लोटे एमआयडीसीतील प्रकल्पात ती वापरात आणली जाणार आहे. या कंपनीचे उत्पादन सुरू झाले नसले, तरी चाचण्या सुरु आहेत. ही बातमी कानी पडताच भयंकर रासायनिक परिणामांच्या भयाने कोकणचा थरकाप उडाला आहे.

फॉरएव्हर केमिकल मानवी शरीरात कोणत्याही माध्यमातून गेले, तर ते कधीही नष्ट होत नाही. पर्यावरणातही ते कधीच नष्ट होत नाही. असे रसायन तयार करणार्‍या या प्रकल्पाला कोकण किनारपट्टीवर परवानगी देताना कडक अटी घातल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला असला, तरी इटलीतील भयानक प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच जुनी यंत्रसामग्री येथे कोकणात वापरली जात असून, ज्या घातक रसायनामुळे इटलीत हाहाकार उडाला तेच रसायन इथे तयार केले जात आहे.

‘पीएफएएस’चा धोका

इटलीत मिटेनी एस.पी.ए. ही रासायनिक कंपनी ‘पीएफएएस’ हे कधीही नष्ट न होणारे फॉरएव्हर केमिकल तयार करत होती. पाण्यातून, मातीतून आणि हवेतूनही हे रसायन इटलीच्या विकेेंझा परिसरातील माणसांमध्ये शिरू लागले. सामान्यत: या ‘पीएफएएस’ रसायनाचे घटक मानवी रक्तात दर मिलिलिटरमागे 8 नॅनोग्रॅम असतील तर चालू शकतात, असे वैद्यकशास्त्र म्हणते. मात्र, इटलीत हे रसायन पाण्यात, मातीत, भूगर्भ जलात सर्वत्र पसरले आणि या मिटेनी कंपनीत काम करणार्‍या कामगारांसह कारखाना परिसरातील लोकांच्या रक्तात या ‘पीएफएएस’ म्हणजेच फॉरएव्हर केमिकलचे प्रमाण दर मिलिलिटरमागे तब्बल 91 हजारांहून अधिक नॅनोग्रॅम आढळले. परिणामी, कर्करोगासह विविध असाध्य रोगांनी थैमान घातले.

इटलीच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेने हा धक्कादायक अहवाल दिल्यानंतर इटली न्यायालयाने गेल्या जून 2025 मध्ये या कंपनीच्या 11 माजी अधिकार्‍यांना एकूण 141 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. फॉरएव्हर केमिकलप्रमाणे ते तयार करणारी कंपनीही बहुधा नष्ट होत नसावी. इटलीने बंद पाडलेली ही कंपनी कायमच बंद होणार नव्हती. तिला महाराष्ट्राच्या कोकणात जणू पुनर्जन्म मिळणार होता. इटलीच्या बंद कंपनीची यंत्रसामग्री लिलावात निघाली आणि बोली लावली ती भारतातल्या विवा लाईफ सायन्सेसने. ही कंपनी लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजची उपकंपनी. लक्ष्मी ऑरगॅनिक्सने 2019 मध्ये लिलावाद्वारे मिटेनीची संपूर्ण यंत्रणा, तंत्रज्ञान आणि पेटंटस् खरेदी केले. इटलीतील कारखाना सुटा करून सुमारे 300 हून अधिक कंटेनर्समधून ही यंत्रसामग्री भारतात आणण्यात आली.

हीच यंत्रणा रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसीत ‘यलो स्टोन फाईन केमिकल्स’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात वापरली जात आहे. एवढेच नव्हे, तर या प्रकल्पातही कधीही नष्ट न होणारे ‘पीएफएएस’ म्हणजेच फॉरएव्हर केमिकलच तयार करणार असल्याचे या कंपनीने अधिकृतपणे जाहीर केले. हे सारे तपशील समोर असतानाही कोकणचा जीव धोक्यात घालून लोटे एमआयडीसीमध्ये ही कंपनी सुरू झाली. खेड तालुक्यातील लोटे परशुराम परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. त्यातच ‘पीएफएएस’सारख्या रसायनांचे उत्पादन सुरू झाल्याने वाशिष्टी नदी, भूगर्भातील पाणी आणि मानवी दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती आता जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे.

ही रसायने एकदा पाण्यात मिसळली की, साध्या शुद्धीकरण प्रक्रियेद्वारे वेगळी करता येत नाहीत. ती मानवी रक्तात साठून राहतात आणि कर्करोग, थायरॉईड विकार, गर्भवती महिलांमधील गुंतागुंत यासारख्या समस्या निर्माण होतात. अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतात ‘पीएफएएस’ रसायनांबाबत स्वतंत्र व कठोर नियम नाहीत. त्यामुळेच युरोपमधून हद्दपार झालेले घातक प्रदूषक उद्योग भारतासारख्या देशांकडे स्थलांतरित होत आहेत. त्यातूनच इटलीने भंगारात काढलेला हा कारखाना भयंकर रसायननिर्मितीसाठी मालक बदलून रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत पोहोचला.

जूनपासूनच उत्पादन सुरू

‘पुढारी’ प्रतिनिधीने कंपनीच्या लोटे येतील प्रकल्पाला भेट दिली. कंपनीचे एचआर मॅनेजर संदेश पाटोळे, कंपनीचे प्रकल्पप्रमुख दीपक पाटील यांनी सांगितले की, गेल्या जूनपासून कंपनीचे प्रॉडक्शन सुरू करण्यात आलेे. मात्र, या प्रॉडक्शननंतर उरलेले घटक व रसायनाची विल्हेवाट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार तळोजा येथे केली जात आहे. कंपनीतून आरएम 65 हे प्रॉडक्शन बनवले जाते. हे प्रॉडक्शन बनवण्यासाठी त्यांना 12 टन प्रॉडक्शनची परवानगी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सोशल मीडियावर लक्ष्मी ऑरगॅनिक या कंपनीचे व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी कंपनीमध्ये ठाण मांडून कंपनीच्या प्रॉडक्शन आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विवेक अहिर यांनीही आपल्या सहकार्‍यांसमवेत कंपनीला भेट देऊन माहिती घेतली आहे.

...तर कंपनीवर बंदी आणली जाईल : मंत्री उदय सामंत

एखादा प्रकल्प कोकणच्या मुळावर उठणारा असेल, तर तो आपण कधीही होऊ देणार नाही, असे राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले. कंपनी घातक आहे, असे स्पष्ट झाले तर कंपनीवर बंदी आणली जाईल. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावलेल्या नोटिसांचा अधिकृत खुलासा होईपर्यंत इतर कोणत्याही माहितीवर जनतेने विश्वास ठेवू नये. कोकणाच्या पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही सामंत म्हणालेे.

कोणताही विनाशकारी प्रकल्प भारतावर लादू नये. लोटे परिसर आधीच केमिकल कंपन्यांनी प्रदूषित झाला आहे, त्यामुळे कोकणातील मच्छीमार संकटात सापडणार आहे. ‘पीएफएएस’ ही रसायने कर्करोग, हृदयरोग, यकृत व मूत्रपिंडांचे नुकसान, हार्मोनल आणि प्रजनन समस्यांशी संबंधित असल्याने अनेक पाश्चिमात्य देशांत त्यावर कडक निर्बंध आहेत. आम्ही कोकणचा निसर्ग नष्ट होऊ देणार नाही.
- प्रशांत परांजपे, अध्यक्ष, निवेदिता प्रतिष्ठान, दापोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news