why fridge blast like bomb summer 5 major mistakes avoid using refrigerator prevention tips
पुढारी ऑनलाईन : बेळगावमध्ये सोमवारी रात्री फ्रिजचा स्फोट होऊन घरातील ४ लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. अशा परिस्थितीत आपणही फ्रिजशी संबंधित आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा प्रकारची घटना टाळता येईल.
बेळगावमध्ये फ्रिजचा स्फोट होऊन 4 जणांचा मृत्यू झाला. गणेशोत्सवादरम्यान हा मोठा अपघात झाला असून, यामध्ये २ जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. आज फ्रिज प्रत्येक घराची गरज बनला आहे आणि क्वचितच असे एखादे घर असेल, जिथे त्याचा वापर होत नसेल. प्रत्येक ऋतूत फ्रिज आपल्या उपयोगी येतो आणि तो साधारणपणे सतत सुरू असतो. मात्र, अशी कोणती चूक आहे ज्यामुळे फ्रिज बॉम्बसारखा फुटू शकतो?
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची योग्य देखभाल आणि काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा छोट्याशा निष्काळजीपणामुळेही मोठा अपघात होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया, फ्रिज वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे.
फ्रिजचा स्फोट का होतो?
फ्रिजचा स्फोट होणे ही सामान्य घटना नाही. काही विशिष्ट परिस्थितींमध्येच असे होऊ शकते. फ्रिजमध्ये वापरली जाणारी रेफ्रिजरंट गॅस, इलेक्ट्रिकल बिघाड, शॉर्ट सर्किट किंवा कंप्रेसरमध्ये झालेल्या खराबीमुळे स्फोट किंवा आग लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याशिवाय आणखी काही कारणांमुळेही अशी घटना घडू शकते.
फ्रिजशी संबंधित 5 मोठ्या चुका जाणून घ्या
विजेचा योग्य पुरवठा
फ्रिज नेहमी अशा ठिकाणी ठेवावा, जिथे विजेचा पुरवठा सुरळीत आणि स्थिर असेल. यामुळे फ्रिजच्या कंप्रेसरवर कमी दबाव पडतो. जास्त दबाव आल्यास फ्रिजमध्ये स्फोटासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच फ्रिजसाठी नेहमी योग्य क्षमतेचा पॉवर प्लग वापरा आणि त्यासाठी योग्य बोर्ड बसवून घ्या. कमी क्षमतेचे प्लग किंवा एक्स्टेंशन बोर्ड वापरणे टाळा.
फ्रिज भिंतीला अगदी चिकटून ठेवणे
फ्रिजच्या मागील बाजूस वायरिंग असते आणि तिथूनच उष्णताही बाहेर पडते. जर फ्रिज भिंतीला अगदी चिकटून ठेवला असेल, तर गरम हवा बाहेर जाण्यासाठी पुरेशी जागा मिळणार नाही. त्यामुळे कंप्रेसरवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो आणि फ्रिज जास्त गरम होऊ शकतो.
फ्रिजची सर्व्हिसिंगही आहे महत्त्वाची
आपण एसी आणि आरओची सर्व्हिसिंग करून घेतो, मात्र फ्रिजची सर्व्हिसिंग फार कमी वेळा केली जाते. बहुतांश घरांमध्ये फ्रिजची सर्व्हिसिंग हा फार मोठा मुद्दा मानला जात नाही. मात्र, फ्रिज हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्यामुळे त्याचीही वेळोवेळी सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. सर्व्हिसिंग केल्यामुळे वायरिंग, प्लग, कंप्रेसर आणि इतर इलेक्ट्रिकल भागांमध्ये काही समस्या असल्यास त्याचा वेळेत शोध घेता येतो.
फ्रिजच्या वर जड वस्तू ठेवणे
फ्रिज हे स्टूल किंवा टेबल नाही, ज्याच्या वर आपण कोणतीही वस्तू ठेवू शकतो. अनेक घरांमध्ये फ्रिजच्या वर जड वस्तू किंवा फळे-भाज्यांनी भरलेल्या टोपल्या ठेवल्या जातात. फ्रिजच्या वर जड वस्तू किंवा उष्णता अडवणाऱ्या वस्तू ठेवणे टाळा. याशिवाय फ्रिजच्या व्हेंटिलेशनच्या भागावर कोणतेही कापड झाकणेही योग्य नाही.
फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ साचू देणे
अनेकदा फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ साचतो आणि आपण तो डिफ्रॉस्ट करायचा विसरतो. जास्त बर्फ साचणे हेही फ्रिजसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे सामान्य तापमान कायम ठेवण्यासाठी फ्रिजला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते. जर फ्रिजमध्ये जास्त बर्फ साचत असेल, तर तो डिफ्रॉस्ट मोडवर सेट करा किंवा काही काळासाठी फ्रिज बंद करा.
फ्रिजशी संबंधित या काळजी नक्की घ्या
फ्रिजमधून कोणत्याही प्रकारचा आवाज किंवा वास येत असल्यास तो तातडीने तपासून घ्या.
फ्रिज खूप जुना झाला असेल तर त्याच्यामुळेही धोका निर्माण होऊ शकतो. फ्रिज अनेक वर्षे जुना झाला असल्यास त्याची वेळेवर सर्व्हिसिंग करून घ्या.
तुम्ही काही दिवसांसाठी बाहेर जात असाल, तर फ्रिज मेन स्विचमधून बंद करा. यामुळे वीजबिलाची बचत होईल आणि फ्रिजही व्यवस्थित राहण्यास मदत होईल.
फ्रिज योग्य प्रकारे कूलिंग करत नसेल, तरी त्याची तपासणी करून घ्या.
फ्रिजसाठी डेडिकेटेड पॉवर लाइन आणि योग्य स्टॅबिलायझर बसवून घ्या, जेणेकरून विजेच्या समस्येमुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होणार नाही.