Cleartrip Unpack 2025 Travel Trends: 2025 मध्ये भारतीयांच्या प्रवासाच्या सवयी बदलल्या असून प्रवास, मुक्काम आणि नियोजनाच्या सवयींमध्ये मोठे परिवर्तन झाल्याचे चित्र समोर आले आहे. फ्लिपकार्टच्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म क्लिअरट्रिपने जाहीर केलेल्या ‘Cleartrip Unpack 2025’ अहवालातून ही माहिती उघड झाली आहे. या वर्षात जनरेशन झेड पर्यटकांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
2025 मध्ये Gen Z प्रवाशांची संख्या तब्बल 650 टक्क्यांनी वाढली. या तरुण प्रवाशांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रवास केला. दुबई, क्वालालंपूर आणि बँकॉक ही ठिकाणे Gen Zची सर्वाधिक पसंतीची ठिकाणे ठरली आहे. बजेट-फ्रेंडली पर्यायांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याचे अहवालात सांगण्यात आलं आहे.
यूपीआय पेमेंट्समध्ये 6 टक्के, तर क्रेडिट कार्ड व्यवहारांमध्ये 8 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, 66 टक्क्यांहून अधिक बुकिंग्स स्मार्टफोनद्वारे करण्यात आल्या आहेत. क्लिअरट्रिपच्या मोबाइल अॅपवरूनच बहुसंख्य प्रवाशांनी फ्लाइट्स आणि हॉटेल्स बुक केली.
2025 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक पर्यटक आले होते. याशिवाय वाराणसी आणि अंदमान बेटांवर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या सरासरी 20 टक्क्यांनी वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यटनात व्हिएतनाम हे सर्वात जास्त पसंतीचे ठिकाण ठरले आहे, पर्यटकसंख्येत 133 टक्क्यांची वाढ झाली. देशांतर्गत पातळीवर दिल्ली आणि बेंगळुरू ही सोलो ट्रॅव्हलसाठी सर्वाधिक पसंतीची शहरे ठरली. दिल्लीहून हिमाचल प्रदेश, जयपूर आणि आग्रा, तर बेंगळुरूहून कूर्ग, उटी आणि कोडाईकनालकडे प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली.
2025 मध्ये पर्यटनाच्या काही नव्या संकल्पना लोकप्रिय झाल्या. ऋषिकेश, कूर्ग आणि अल्लेपी येथे ‘कॅल्मकेशन’चा ट्रेंड दिसून आला. गोवा, पॉंडिचेरी आणि दार्जिलिंग ही ‘वर्केशन’साठी पसंतीची ठिकाणे ठरली. स्पीती, अंदमान आणि लडाख येथे ‘डिजिटल डिटॉक्स’, तर बीर बिलिंग, लक्षद्वीप आणि औली येथे साहसी पर्यटकांची संख्या वाढली.
या वर्षी काही अनोख्या बुकिंग्सही समोर आल्या. काही प्रवाशांनी 361 दिवस आधीच हॉटेल बुकिंग केले, तर 3 लाख लोकांनी रात्री 3 ते पहाटे 4 दरम्यान फ्लाइट्स बुक केल्या. बेंगळुरूमध्ये एका पर्यटकाने सलग 30 दिवस, तर कोलकात्यात 29 दिवस मुक्काम केला.
सर्वात स्वस्त फ्लाइट 0 रुपयांत, तर सर्वात स्वस्त हॉटेल 48 रुपयांत बुक झाले. याउलट, सर्वात महाग फ्लाइटसाठी 4.43 लाख रुपये, तर मालदीवमधील सर्वात महाग हॉटेल मुक्कामासाठी 4.41 लाख रुपये पर्यटकांनी दिले.
डिपार्चरच्या अवघ्या 48 तासांआधी 38 लाख फ्लाइट बुकिंग्स करण्यात आल्या. यावरून भारतीयांमध्ये अचानक किंवा स्पॉन्टेनियस प्रवासाची सवय वेगाने वाढत असल्याचे स्पष्ट झाले.
क्लिअरट्रिप अनपॅक 2025 अहवालातून एक गोष्ट ठळकपणे समोर आली, भारतीय पर्यटक आता अधिक स्मार्ट, डिजिटल आणि अनुभव-केंद्रित प्रवासाकडे वळत आहेत आणि या बदलात Gen Z आघाडीवर आहे.