पाऊस कधीही कोसळू शकतो! ऑफिस- कॉलेजला जाताना बॅगमध्ये ठेवा 'या' गोष्टी file photo
फीचर्स

Monsoon Season : पाऊस कधीही कोसळू शकतो! ऑफिस- कॉलेजला जाताना बॅगमध्ये ठेवा 'या' गोष्टी

पावसाळ्यात ऑफिस आणि कॉलेजला जाणाऱ्यांनी 'या' वस्तू बॅगमध्ये नक्की ठेवा..

पुढारी वृत्तसेवा

Those going to office and college during the monsoon season should definitely keep these items in their bags

पुढारी ऑनलाईन : पावसाळ्यात दररोज ऑफिस किंवा कॉलेजला ये-जा करणाऱ्यांना अचानक पडणारा मुसळधार पाऊस, इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजण्याचा धोका, कपडे ओले होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी बॅगमध्ये काही आवश्यक वस्तू ठेवल्यास या अडचणींपासून मोठ्या प्रमाणात बचाव होऊ शकतो.

पावसाळा हा हिरवळ, आल्हाददायक वातावरण आणि गारवा घेऊन येतो, त्यामुळे अनेकांना हा ऋतू आवडतो. मात्र, रोज प्रवास करणाऱ्यांसाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक ठरू शकतो. अचानक कोसळणारा पाऊस, रस्त्यांवर साचलेले पाणी, कपडे भिजणे किंवा मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होण्याची भीती अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे बॅगमध्ये काही आवश्यक वस्तू ठेवल्यास तुमचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होऊ शकतो. जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तू आहेत.

कॉम्पॅक्ट छत्री

ऑफिस किंवा कॉलेजची बॅग आधीच पुस्तकं आणि इतर सामानामुळे जड असते. अशा वेळी कमी जागा घेणारी कॉम्पॅक्ट छत्री सोबत ठेवणे फायदेशीर ठरते. अचानक पाऊस सुरू झाल्यास ती त्वरित उपयोगी पडते. नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी ही एक अत्यावश्यक वस्तू आहे.

रेनकोट

जर तुम्ही स्कूटर किंवा मोटारसायकलने ऑफिस किंवा कॉलेजला जात असाल, तर रेनकोट नक्की सोबत ठेवा. लांबच्या प्रवासात तो पावसापासून प्रभावी संरक्षण देतो. शिवाय, तो घडी करून सहज बॅगमध्ये ठेवता येतो आणि फारशी जागाही घेत नाही.

वॉटरप्रूफ बॅग कव्हर

अनेकदा घरातून निघताना पाऊस नसतो, पण परतताना अचानक मुसळधार पाऊस सुरू होतो. त्यामुळे बॅगमधील महत्त्वाची कागदपत्रे, पुस्तके किंवा इतर वस्तू भिजण्याची शक्यता असते. अशा वेळी वॉटरप्रूफ बॅग कव्हर उपयोगी पडते. त्यामुळे बॅगमधील सामान सुरक्षित राहते.

झिपलॉक बॅग

महागडा मोबाईल, इअरफोन्स किंवा इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स पाण्यामुळे खराब होऊ नयेत म्हणून बॅगमध्ये एक लहान झिपलॉक बॅग ठेवावी. अचानक पाऊस सुरू झाल्यास त्यामध्ये मोबाईल किंवा इतर महत्त्वाच्या वस्तू ठेवून सुरक्षित करता येतात.

मायक्रोफायबर टॉवेल

काही वेळा पाऊस इतका जोरदार असतो की छत्री किंवा रेनकोट असूनही आपण भिजतो. अशा वेळी हात, चेहरा किंवा मोबाईलची स्क्रीन पुसण्यासाठी एक छोटा मायक्रोफायबर टॉवेल सोबत ठेवणे उपयुक्त ठरते.

सॅनिटायझर आणि टिश्यू पेपर

पावसाळ्यात ओलावा आणि अस्वच्छता वाढते. त्यामुळे हात स्वच्छ ठेवण्यासाठी बॅगमध्ये हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक आहे. तसेच टिश्यू पेपरही सोबत ठेवा. प्रवासादरम्यान गरज पडल्यास त्याचा अनेक प्रकारे उपयोग होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT