

शशिकांत सावंत
अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून रखडल्याने कोकणातील भात शेती आणि जलसाठ्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पाऊस उशिरा येत असल्याने शेतकरी, उद्योग आणि उपजीविकेवर दुहेरी आर्थिक ताण वाढला आहे.
जवळजवळ गेल्या ११ वर्षांच्या सुरक्षित मान्सूनच्या प्रवासानंतर आता अल निनोच्या प्रभावामुळे टंचाईचे आणि दुष्काळाचे ढग घोंगावू लागले आहेत. कोकण भाग हा भाताचे सर्वाधिक उत्पादन देणारा प्रदेश आहे. या भागामध्ये सिंधुदुर्गपासून पालघरपर्यंत पाचही जिल्ह्यांत भातशेती हेच प्रमुख पीक आहे. कोकणची ‘वाडा कोलम’ ही भाताची सर्वाधिक मागणी असलेली जात आहे; मात्र जूनचा तिसरा आठवडा संपला, तरी पाऊस येण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे भात पेरण्या तर पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांमध्ये सर्वाधिक शेती होते. यावेळचा हंगाम मात्र चिंतेचे ढग निर्माण करत आहे.
इतिहासाचा आढावा घेतला, तर १९७२ पासून २०२६ हा ५४ वर्षांच्या कालखंडात ११ वेळा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यातील ९ वेळा दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला. आताही मान्सूनने ओढ दिल्यामुळे कोकणात एका बाजूला तीव्र पाणीटंचाई आणि दुसऱ्या बाजूला भात शेतीवरील संकट अशा दुहेरी प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. भाताच्या पेरण्या न झाल्यामुळे ८० ते ९० दिवसांचे एक पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. सध्या हवामानातील वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने जलसाठे, विहिरी आणि धरणातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणावर कमी होऊ लागली आहे. त्यामुळे एका बाजूला पिण्याच्या पाण्याची टंचाई, तर दुसऱ्या बाजूला शेतीवरील संकट असे दुहेरी संकट कोकण भागात घोंगावताना दिसत आहे. उष्णतेच्या लाटांचा मारा सुरू असल्याने कोकणात आरोग्यविषयी समस्याही वाढल्या आहेत. आतापर्यंत कोकणात १०० ते १२० मि.मी. पाऊस झाला आहे. तो मागच्या वर्षी ७५० मि.मी. होता. आता २५ जूनला पाऊस परतेल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. अरबी समुद्रातील मान्सूनचे वारे पुढे ओढणारी सोमाली जेट ही वायू प्रणाली कमकुवत झाल्याने मान्सून रखडला आहे. तो पुन्हा सक्रिय होण्यास आता जून अखेर येणार आहे; मात्र यामध्ये पेरणीचा मुख्य हंगाम निघून गेल्याने कोकणच्या भात शेतीवर संकट गडद झाले आहे. शासनाने पेरणीची घाई करू नये, असे सांगितले असले, तरी मान्सूनचा पहिला महिना कोरडा गेल्याने पुढील कालावधीत भाताचे पीक होणे केवळ अशक्य झाले आहे.
कोकण प्रदेशात दरवर्षी साडेतीन हजार मि.मी. पेक्षा जास्त पाऊस पडत असल्याने या प्रदेशाचे प्रादेशिक पीक हे भात आहे. कारण, भात पिकाला लागणारा आवश्यक पाऊस पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत पडतो आणि येथील माणसांचे बहुतांश अर्थकारण यावर अवलंबून आहे. एका बाजूला दुबार पेरण्यांचे संकट आणि दुसऱ्या बाजूला ९० दिवसांपर्यंतची पिके यावेळी नेमकी येतील की नाही, याबाबतची धाकधूक शेतकऱ्यांच्या मनात पाहायला मिळत आहे. कोकणात भात आणि भातावर आधारित प्रक्रिया उद्योग अधिक प्रमाणात आहे. यामध्ये पोह्यापासून पापडापर्यंत अनेक उत्पादने तांदळापासून तयार केली जातात. हे पीकच संकटात आल्यामुळे त्यावर आधारित उद्योगांवरही संकट आले.
भातापासून तांदूळ तयार करणाऱ्या मिलही आहेत. हे सर्व उद्योग सध्या अडचणीत आहेत. पाऊस कमी झाल्याने पाण्याचे प्रमाणही कमी आहे. याचा परिणाम कोकणातील मस्त्य उद्योगावरही होणार आहे. भातशेतीवर निर्वाह करणारे कोणात २५ लाखांपेक्षा जास्त शेतकरी आहेत. १५ ते १८ लाख मच्छीमार व्यवसायात आहेत. या सर्वांचेच अर्थकारण बिघडवणारा असे हे संकट असल्याने त्याचे गांभीर्य अधिक आहे. शासकीय पातळीवरून या सर्व परिस्थितीवर मात करण्यासठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले गेले आहे; परंतु तशा ठोस उपाययोजना काही सुरू नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला या संकटाची चिंता अधिक वाटत आहे. एका बाजूला शासकीय तिजोरीत पैसा कमी असल्याची ओरड तर दुसऱ्या बाजूला कर्जमाफीची घोषणाही अनेक जाचक अटींमध्ये अडकल्याचा होणारा प्रचार आणि पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी घेतलेला आखडता हात अशी अनेक संकटे बळीराजासमोर उभी आहेत. कमी पावसाचे संकट हे नैसर्गिक असले, तरी त्यावर उपाययोजना करणे सरकारच्या हाती आहे. म्हणूनच या गंभीर संकटावर अधिक सक्षमपणे उपाय होणे गरजेचे आहे.