

अंजली महाजन
सध्या डिजिटल जगतात एक नवा आणि वेगवान ट्रेंड वेगाने पाय पसरत आहे, तो म्हणजे ‘मायक्रो ड्रामा’. केवळ ९० सेकंद ते २ मिनिटांचे एपिसोड असलेल्या या व्हर्टिकल स्वरूपातील व्हिडीओ सीरिजनी सध्या प्रेक्षकांना वेड लावले आहे. रील्स आणि यूट्यूब शॉटस् जमान्यात हा प्रकार मनोरंजन क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकत आहे. यामध्ये पारंपरिक मालिका किंवा चित्रपटांप्रमाणे मोठी दृश्ये नसतात. प्रत्येक एपिसोड साधारणपणे एक ते दोन मिनिटांचा असतो आणि प्रत्येक मिनिटाला कथेमध्ये एक उत्कंठावर्धक वळण दिले जाते. एका सीरिजमध्ये साधारणपणे ५० ते ९० एपिसोड असतात. वेगवान कथा, तीव्र भावना, सूड, रहस्य आणि झटपट मिळणारे मनोरंजन ही या मायक्रो ड्रामाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हाताळताना मोबाईलच्या संपूर्ण पडद्यावर उच्च दर्जाचे आणि लख्ख प्रकाशातील उभे व्हिडीओ अचानक समोर येतात. एका साध्या क्लिकवर आपल्याला एका विशिष्ट अॅप्लिकेशनवर नेऊन, सुरुवातीचे काही भाग मोफत दाखवून पुढील भागांसाठी पैशांची मागणी करणार्या या छोट्या व्हिडीओ मालिका म्हणजेच मायक्रो ड्रामा होय. अवघ्या 50 सेकंदांचे हे भाग प्रेक्षकांना असे काही खिळवून ठेवतात की, चुकूनही ते स्क्रोल करणे शक्य होत नाही. हे केवळ साधे मनोरंजन नसून मनोरंजनविश्वाची व्याख्या बदलणारा एक प्रचंड मोठा प्रवाह ठरत आहे. आजकालच्या प्रेक्षकांकडे मोठा चित्रपट पाहण्यासाठी वेळ किंवा संयम नसतो. प्रवासात, ऑफिसच्या ब्रेकदरम्यान किंवा अगदी ५ मिनिटांच्या मोकळ्या वेळात हे एपिसोड सहज पाहता येतात.
या मायक्रो ड्रामाची खरी सुरुवात चीनमधून झाली असून तिथे याला दुआनजू असे म्हटले जाते. २०१८ मध्ये चीनमधील निर्मात्यांनी मोबाईलच्या उभ्या पडद्याचा कौशल्याने वापर करून छोट्या भागांची मिनी सीरिज तयार करण्याचा अनोखा प्रयोग केला. जेव्हा जगातील इतर देशांमधील तरुण पिढी केवळ डान्स व्हिडीओ आणि रील्स बनवण्यात व्यस्त होती, तेव्हा चीनमध्ये या नव्या माध्यमाचा व्यावसायिक पाया रचला जात होता. उत्कंठावर्धक वळणे, रोमान्स आणि तीव्र भावनांचा मेळ असलेल्या या कथा कोरोना महामारीच्या काळात कमालीच्या लोकप्रिय झाल्या. रीलशॉर्ट नावाच्या एका चिनी अॅपला अमेरिकेत एका टप्प्यावर नेटफ्लिक्सपेक्षाही अधिक डाऊनलोडस् मिळाले होते. आज जगातील सुमारे दहा टक्के लोकसंख्या हे मायक्रो ड्रामा नियमितपणे पाहत आहे.
या नव्या प्रवाहाने आता हॉलीवूडसारख्या जगातील सर्वात मोठ्या चित्रपटसृष्टीलाही गंभीर विचार करायला भाग पाडले आहे. फॉक्स एंटरटेनमेंटसारखी मातब्बर निर्मिती संस्था आगामी दोन वर्षांत दोनशेहून अधिक मायक्रो ड्रामा मालिका बनवण्याच्या मोठ्या योजनेवर काम करत आहे. पारंपरिक वेब सीरिजच्या तुलनेत या मायक्रो ड्रामाचा निर्मिती खर्च अत्यंत कमी असतो. जिथे नेटफ्लिक्सच्या 'स्ट्रेंजर थिंग्ज'सारख्या अत्यंत लोकप्रिय मालिकेच्या एकाच भागासाठी सुमारे सहा कोटी डॉलर्स खर्च होतात, तिथे मायक्रो ड्रामाची संपूर्ण मालिका अवघ्या एक ते तीन लाख डॉलर्समध्ये तयार होते. कमी खर्चात जास्त परतावा देणारे हे गणित जागतिक पातळीवर निर्मात्यांना आकर्षित करत आहे.
तज्ज्ञांच्या मते, या मायक्रो ड्रामाच्या अफाट लोकप्रियतेचे मुख्य कारण त्याची हूक डेन्सिटी हे आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक काही सेकंदांनंतर प्रेक्षकांसमोर असा काही प्रसंग, रहस्य किंवा भावनिक वळण सादर केले जाते, ज्यामुळे त्याची उत्सुकता सर्वोच्च पातळीवर टिकून राहते. चीनमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ऑनलाईन कादंबर्यांमधील श्रीमंत सीईओ, कौटुंबिक वाद किंवा बदल्याच्या कथांचा अभ्यास करून, वाचकांच्या प्रतिसादानुसार या मालिकांचे लेखन केले जाते. यामध्ये प्रामुख्याने महिला प्रेक्षकांना आकर्षित करणार्या भावनिक विषयांची भरमार असते. इतकेच नव्हे, तर चीनमधील काही बड्या कंपन्या आता या मालिकांमध्ये मानवी कलाकारांऐवजी ८० टक्क्यांपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून निर्मिती खर्च आणखी कमी करत आहेत.
भारतातही हा बाजार अत्यंत वेगाने विस्तारत असून भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेचा यात मोठा वाटा आहे. लुमीकायच्या ताज्या अहवालानुसार, भारतातील मायक्रो ड्रामाची बाजारपेठ केवळ एका वर्षात २५०० ते २८०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. भारतात आधीच इन्स्टाग्राम रील्स आणि यूट्यूब शॉटस् पाहणारा ४० कोटींहून अधिक मोठा वर्ग तयार आहे. महागड्या ओटीटी वर्गणीच्या तुलनेत कमी खर्चात आणि कमी वेळेत वेगवान मनोरंजन देणारा हा पर्याय भारतीय प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. चीनमध्ये हा उद्योग २०३० पर्यंत तो १६ अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करेल, असा अंदाज आहे. भारतात २०२५ मध्ये सर्वाधिक डाऊनलोड केल्या गेलेल्या टॉप ५ व्हिडीओ स्ट्रीमिंग अॅप्सपैकी ३ अॅप्स हे मायक्रो ड्रामा प्लॅटफॉर्म्स (उदा. कुकू टीव्ही, स्टोरी टीव्ही, क्विक टीव्ही) होते. भारतीय मायक्रो ड्रामा बाजारपेठ २०३० पर्यंत ४.५ अब्ज डॉलर्स (सुमारे ३९ हजार कोटी रुपये) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या क्षेत्रातून महसूल मिळवण्यासाठी सध्या प्रामुख्याने चार प्रकारच्या व्यावसायिक पद्धती वापरल्या जात आहेत. पहिल्या प्रकारात जाहिरात प्रारूप येते, ज्यामध्ये प्रेक्षक संपूर्ण आशय मोफत पाहतात आणि दरम्यान त्यांना जाहिराती दाखवल्या जातात. दुसर्या प्रकारात वर्गणी प्रारूप येते, ज्यामध्ये ग्राहकांकडून मासिक किंवा वार्षिक शुल्क आकारले जाते. तिसरे प्रारूप हे प्रीमियम स्वरूपाचे असते, ज्यामध्ये काही सुरुवातीचे भाग मोफत, तर उर्वरित महत्त्वाचे भाग पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतात. चौथ्या प्रकारात प्रतिभाग पेमेन्ट पद्धत असते, ज्यामध्ये पुढील प्रत्येक नवीन भाग अनलॉक करण्यासाठी स्वतंत्रपणे लहान रक्कम द्यावी लागते. भारतात सध्या डिस्नी प्लस हॉटस्टार सारख्या मुख्य प्रवाहातील मंचांवर तडका सारखे प्रयोग केले जात आहेत, तर कुकू एफएम आणि स्टोरीमॅक्ससारखे आघाडीचे मंच याच प्रकारच्या प्रभावी कथाकथनावर काम करत आहेत. त्यामुळे मोबाईलच्या पडद्यावर दिसणारे हे छोटे व्हिडीओ केवळ करमणुकीचे साधन नसून, मनोरंजनविश्वाला कायमचे बदलून टाकणारा अब्जावधी रुपयांचा एक नवा जागतिक व्यवसाय ठरत आहेत.
हा नवा प्रवाह पारंपरिक दूरचित्रवाणी वाहिन्या आणि मोठ्या ओटीटी मंचांच्या अस्तित्वाला थेट आव्हान देत आहे. आजचा प्रेक्षक टीव्हीसमोरील ठरावीक वेळेत बसून राहण्याऐवजी स्वतःच्या वेळेनुसार मनोरंजन निवडत आहे. यामुळे पारंपरिक जाहिरातदार आता आपला मोर्चा या छोट्या आणि उभ्या पडद्यावरील मालिकांकडे वळवत आहेत. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा हा सर्वात प्रभावी मार्ग ठरत आहे. भविष्यात या मायक्रो ड्रामामध्ये प्रेक्षकांना स्वतः कथेचा मार्ग निवडण्याची सोय असणारे इंटरअॅक्टिव्ह पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षक केवळ एक प्रेक्षक न राहता कथेचा एक भाग बनेल आणि यातूनच मनोरंजनाची एक संपूर्ण नवीन परिसंस्था निर्माण होईल, यात शंका नाही.