Meta च्या मालकीचे असलेले WhatsApp आता आपल्या प्लॅटफॉर्मवरील वाढत्या स्पॅम आणि नको असलेल्या मेसेजेसवर लगाम घालण्याच्या तयारीत आहे. या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनी एक नवीन फीचर चाचणी करत आहे, जे लवकरच युजर्सना लागू होण्याची शक्यता आहे. या फीचरमुळे वारंवार मेसेज पाठवणाऱ्या आणि ज्यांना उत्तर मिळत नाही, अशा युजर्सना मेसेज पाठवण्याची मर्यादा येणार आहे.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp चा हा नवीन फीचर चॅटिंग अधिक संतुलित आणि वास्तविक बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. हे फीचर लॉन्च झाल्यावर, ते साधे युजर्स आणि बिझनेस अकाउंट्स अशा दोघांवरही लागू होईल.
कसे काम करेल? जर कोणताही युजर वारंवार ए खाद्या व्यक्तीला मेसेज करत असेल जो उत्तर देत नाही, तर त्या युजरला मेसेज पाठवण्याच्या संख्येवर मर्यादा लागू केली जाईल.
अलर्ट नोटिफिकेशन: महत्त्वाचे म्हणजे, WhatsApp यासाठी एक नोटिफिकेशन अलर्ट देखील पाठवेल. यामुळे युजर्सना ते त्यांच्या मासिक मेसेज लिमिटच्या जवळ आहेत की त्यांनी ती ओलांडली आहे, हे कळेल.
नवीन फीचरअंतर्गत, अॅपच्या सेटिंग्जमध्ये एक नवीन पर्याय जोडला जाईल, जिथे युजरने या महिन्यात किती नवीन चॅट्स सुरू केल्या आहेत, हे तो पाहू शकेल.
काय वगळले जाईल? हा नियम सध्या सुरू असलेल्या गप्पांवर लागू होणार नाही. याचा अर्थ, ज्यांच्याशी तुम्ही आधीपासून बोलत आहात, त्यांच्याशी तुम्ही बिना कोणत्याही अडथळ्याविना चॅटिंग करू शकता.
तात्पुरती बंदी: मात्र, जर एखाद्या युजरने ही ठरवून दिलेली मर्यादा ओलांडली, तर त्याला अस्थायी स्वरूपात अनोळखी लोकांना मेसेज पाठवण्यापासून ब्लॉक केले जाऊ शकते.
सक्रिय चॅट्सवर परिणाम नाही: विशेष म्हणजे, ज्या मेसेजला उत्तर मिळते, तो मेसेज या लिमिटमध्ये मोजला जाणार नाही. त्यामुळे सक्रिय चॅट्सवर कोणताही परिणाम होणार नाही.
WhatsApp गेल्या काही वर्षांपासून स्पॅम, फेक मेसेजिंग आणि प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी सातत्याने अनेक सुरक्षा फीचर्स आणत आहे. यात कोणालाही ब्लॉक करणे, मार्केटिंग अपडेट्समधून अनसबस्क्राइब करणे, आणि नवीन अकाउंट्सवरून बल्क मेसेज पाठवण्यावर मर्यादा घालणे, यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. हा नवीन 'मॅसेज लिमिट' फीचर याच प्रयत्नांचा एक भाग आहे.