AI job displacement latest update
टेक न्यूज : इतिहासाने नेहमीच बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले आहे, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात आपण हे बदल स्वीकारू शकू का? हा प्रश्न आज महत्त्वाचा ठरत आहे. AI च्या वाढत्या प्रभावामुळे रोजगाराच्या स्वरूपात मोठे बदल होत आहेत. एकेकाळी आवश्यक वाटणारी अनेक कामे आता कालबाह्य होत असून, त्यांच्या जागी पूर्णपणे नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
ओपनएआयचे (OpenAI) सीईओ सॅम ऑल्टमन यांनी नुकतेच म्हटले आहे की, "आपण आता अशा टप्प्यावर आलो आहोत, जिथून परत AI पासून पाट फिरवणे आता अशक्य नाही; उड्डाण सुरू झाले आहे." त्यांच्या या विधानाने स्पष्ट संकेत मिळतात की, बुद्धिमान मशिन्सचे युग सुरू झाले आहे आणि त्यामुळे कामाच्या स्वरूपाची नव्याने व्याख्या केली जाईल.
AI चा प्रभाव केवळ एका उद्योगापुरता मर्यादित नाही. मोठ्या प्रमाणातील पुनरावृत्तीची कामे हाताळण्याच्या क्षमतेमुळे लॉजिस्टिक्सपासून ते कायद्यापर्यंत सर्वच क्षेत्रांवर याचा परिणाम होईल. इतिहास साक्षी आहे की, नवीन तंत्रज्ञान काही नोकऱ्या काढून टाकते, तर काही नवीन नोकऱ्या निर्माण करते. AI सुद्धा याला अपवाद नाही.
AI च्या युगात काही नवीन भूमिका उदयास येत आहेत, यामुळे नवीन रोजगार देखील उदयास येत आहेत. ज्यात खालील पदांचा समावेश आहे;
प्रॉम्प्ट इंजिनिअर्स : AI सिस्टीमसाठी प्रभावी इनपुट तयार करणारे विशेषज्ञ.
डेटा क्युरेशन लीड्स : AI च्या ट्रेनिंग डेटाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवणारे व्यावसायिक.
मॉडेल-बायस ऑडिटर्स : AI मॉडेल्स कोणताही धोकादायक पूर्वग्रह न ठेवता निष्पक्षपणे काम करत आहेत, याची खात्री करणारे व्यावसायिक.
एआय ऑप्स टेक्निशियन्स : AI च्या पायाभूत सुविधांची देखभाल करणारे तंत्रज्ञ.
सिंथेटिक मीडिया डिझायनर्स : AI च्या मदतीने नवनवीन स्वरूपात मीडिया कंटेंट तयार करणारे क्रिएटिव्ह व्यावसायिक.
दुसरीकडे, एंट्री-लेव्हल आणि ब्लू-कॉलर कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. यामध्ये पायथन डीबगिंग, ज्युनियर पॅरालीगल रिसर्च, एंट्री-लेव्हल मार्केटिंग कॉपी तयार करणे, ग्राहक सेवेसाठी मॅक्रो तयार करणे आणि बातम्यांचे प्राथमिक सारांश तयार करणे यासारख्या कामांचा समावेश आहे. मानवी अनुवादकांची जागा आता अत्यंत वेगाने सबटायटल तयार करणारी इंजिन्स घेत आहेत. अँथ्रोपिकचे (Anthropic) सह-संस्थापक डारियो अमोदेई यांच्या मते, पुढील पाच वर्षांत आजच्या निम्म्या एंट्री-लेव्हल ऑफिस नोकऱ्या नाहीशा होऊ शकतात.
जसजसे AI विविध उद्योगांमध्ये आपले स्थान निर्माण करत आहे, तसतसे तज्ञांचे मत आहे की, कर्मचाऱ्यांनी कौशल्यवृद्धीवर (upskilling) लक्ष केंद्रित केले पाहिजे. AI टूल्सवर प्रभुत्व मिळवल्यास संभाव्य धोका संधीमध्ये बदलू शकतो. याशिवाय, आंतरवैयक्तिक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे, कारण अल्गोरिदमला अजूनही मानवी संवाद आणि भावना समजणे कठीण जाते.
इतिहास सांगतो की, स्थित्यंतराचा काळ कठीण असला तरी समाज जुळवून घेतो आणि रोजगाराचे नवीन मार्ग शोधतो. ज्याप्रमाणे छपाई यंत्राने लेखकांची आणि वाफेच्या मागांनी विणकरांची जागा घेतली, त्याचप्रमाणे AI कामाचे स्वरूप बदलेल. जे लोक AI चा स्वीकार करून या शक्तिशाली अल्गोरिदमसोबत काम करायला शिकतील, ते या नव्या युगात नक्कीच यशस्वी होतील.