

आशिष शिंदे, कोल्हापूर
तंत्रज्ञान जस जसे दिवसागणिक बदलतेय, तितक्याच वेगाने सायबर चोरट्यांचं नेटवर्कही स्मार्ट होत आहे. आता तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) नावाखालीही गंडा घालण्याचे नवे स्वरूप उगम पावत आहे. २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आदित्यला एका सोशल मीडिया प्रोफाईलवरून 'एआय बेस्ड ट्रेडिंग बॉट' विषयी मेसेज आला. हा बॉट दिवसाला ३ ते ५ टक्के परतावा देतो, असे सांगून त्याला एका प्रायव्हेट चॅनेलमध्ये सहभागी करण्यात आले. चॅटमध्ये सगळे काही हायटेक, टेक्निकल चार्टस्, प्रॉफिट स्क्रीनशॉटस्, बॉटचे लाईव्ह अपडेटस् पाहून आदित्य भारावून गेला.
त्याला सांगण्यात आले, पहिले तुम्ही डेमो ट्रेडिंग करा. त्यानंतरच गुंतवणूक करा, डेमो अकाऊंटमध्ये त्याला दहा हजार रुपयांचे ट्रेड करण्यासाठी व्हर्चुअल पैसे देण्यात आले. काही तासांत त्याला ११,००० चा स्क्रीनशॉट पाठवण्यात आला. हे पाहून आदित्यचा त्यावर विश्वास बसला. त्याला एक लिंक पाठवून त्यावर ५०,००० रुपये ट्रान्स्फर करण्यास सांगितले; मात्र पैसे ट्रान्स्फर होताच त्याचे लॉगिन लॉक झाले. टेलिग्राम चॅनेल गायब, प्रोफाईल डिलीट. मोबाईल नंबर बंद.
सायबर चोरट्यांनी एआयचा वापर करून स्क्रिप्टेड बॉटस्द्वारे त्याला गंडा घातला होता. सध्या सोशल मीडियावर एआय बॉटस्द्वारे क्रिप्टो करेन्सीच्या गुंतवणुकीत अनेक पटीने परतावा देण्याची हमी दाखवली जात आहे. बऱ्याचदा यामध्ये सायबर चोरट्यांचे सापळे असतात. एआय ट्रेडिंग बॉट स्कॅम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केला जातो. सर्वप्रथम सायबर चोरटे सोशल मीडियावर बनावट प्रोफाईल तयार करतात. हे अकाऊंट्स दिसायला प्रोफेशनल वाटावीत म्हणून त्यावर एआय-जेनरेटेड चेहऱ्यांचे फोटो, खोट्या कंपन्यांची नावे, आणि बनावट अनुभव टाकला जातो. हेच प्रोफाईल एआय ट्रेडिंग बॉटद्वारे हमखास नफा देणाऱ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवतात. त्यावर लॉगिन, डॅशबोर्ड, आणि ट्रेडिंगचा इतिहास दाखवला जातो.
सुरुवातीला बॉट काही दिवस छोटा नफा दाखवतो, ज्यामुळे वापरकर्त्याचा विश्वास बसतो. एकदा मोठी रक्कम गुंतवली की, वेबसाईट बंद होते, टेलिग्राम ग्रुप गायब होतो आणि स्कॅमर फरार होतो. हे सर्व करण्यासाठी ते एआय टूल्स, डीप फेक, ऑटो-रिस्पॉन्स स्क्रिप्ट्स आणि क्रिप्टो पेमेंट लिंकचा वापर करतात, ज्यामुळे गुन्हा शोधणे अधिक कठीण होते. एआय, क्रिप्टो, ट्रेडिंग बॉटस् या नावांनी जर कोणी 'त्वरित नफा' देतो असे सोशल मीडियावरील जाहिरातीत सांगत असेल, तर जरा सावध व्हा.
त्यामागे धोका आहेच, एआय ट्रेडिंग बॉट स्कॅमपासून वाचण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे सावधगिरी आणि पडताळणी. कुठलीही गुंतवणूक झटपट नफा, गॅरंटीड रिटर्न अशा जाहिरातींमुळे करू नये. अशा ऑफरसोबत आलेली लिंक, वेबसाईट किंवा प्रोफाईल नेहमी तपासा. अधिकृत संस्था जसे की सेबी यांच्याकडून मान्यता आहे का, हे पाहणे अत्यावश्यक आहे. सोशल मीडियावर आलेले एआय बॉटस्चे संदेश, किंवा अनोळखी व्यक्तीकडून आलेले कॉल, ओटीपी, किंवा क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवण्यात लिंक पाठवल्यास त्वरित सावध होऊन सायबर पोलिसांशी संपर्क साधा.