डिजिटल जगात सुरक्षिततेसाठी वापरले जाणारे 'कॅप्चा' (Captcha) आता ऑनलाइन फसवणुकीचे नवे माध्यम बनले आहे. सायबर चोरट्यांनी 'मी रोबो नाही' ('I’m Not a Robot') या पर्यायाचा वापर करून लोकांना बनावट वेबसाइट्सवर पाठवण्याची आणि त्यांची संवेदनशील माहिती चोरण्याची नवी युक्ती शोधली आहे.
पूर्वी फिशिंग (Phishing) हल्ला करणे कठीण होते, पण आता ते खूप सोपे झाले आहे. Vercel, Netlify किंवा अशाच इतर मोफत होस्टिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर करून सायबर चोरटे काही मिनिटांत अगदी खऱ्या वेबसाइट्ससारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइट्स तयार करत आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) वाढत्या वापरामुळे बनावट वेबसाइट्स ओळखणे आणखी कठीण झाले आहे. या फिशिंग साइट्सचे डिझाइन, मजकूर आणि सुरक्षेचे संदेश इतके खरे वाटतात की, युजर्सला खरी आणि बनावट वेबसाइट यातील फरक ओळखणे जवळपास अशक्य होते. जेव्हा युजर पासवर्ड रीसेट, डिलिव्हरी अपडेट किंवा बँक पडताळणी यांसारख्या मेसेजेसवर क्लिक करतो, तेव्हा त्याला एक बनावट फॉर्म भरण्यास सांगितले जाते. त्याचक्षणी त्यांची ईमेल आयडी, बँक डिटेल्स किंवा इतर महत्त्वाची माहिती सायबर गुन्हेगारांच्या हाती लागते.
या वाढत्या सायबर स्कॅमपासून वाचण्यासाठी सतर्कता आणि जाणून घेण्याची वृत्ती अत्यंत आवश्यक आहे.
URL तपासा: कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिचा URL (वेबसाइटचा पत्ता) नक्की तपासा.
सुरक्षित कनेक्शन: वेबसाइट नेहमी https ने सुरू झाली पाहिजे आणि तिचे डोमेन नेम (Domain Name) अधिकृत संस्थेशी जुळणारे असावे.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA): तुमच्या सर्व खात्यांवर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू ठेवा. यामुळे पासवर्ड लीक झाला तरी तुमचे खाते सुरक्षित राहते.
अपडेट्स: आपला ब्राउझर आणि सुरक्षा सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करा.
रिपोर्ट करा: एखादा संशयास्पद ईमेल किंवा वेबसाइट आढळल्यास त्वरित CERT-In (इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम) किंवा संबंधित कंपनीला कळवा.