

Online job scams
‘सर, तुम्हाला पार्टटाईम घरबसल्या कमावण्याची संधी आहे. एका टास्कमागे 500 ते 4,500 रुपये मिळतील. तुम्ही लगेच काम सुरू करू शकता’, असाच एक मेसेज 33 वर्षीय आदित्य यांना टेलिग्रामवर आला, मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर त्यांनी क्लिक केले आणि काही दिवसांतच त्यांनी जवळपास 28 लाख रुपये गमावले. ऑनलाईन जॉब स्कॅमचे हे एक धक्कादायक उदाहरण आहे, जे सध्या सोशल मीडियावर आणि मेसेजिंग अॅप्सवर जोरात सुरू आहे. देशभरात अशा स्कॅमद्वारे अनेकांना गंडा घालण्यात आला आहे.
सुरुवात झाली एका अनोळखी व्यक्तीच्या मेसेजने. आदित्यला सांगण्यात आले की, एका वेबसाईटवर हॉटेल्सचे रिव्ह्यू लिहायचे आहेत आणि त्यावर चांगले पैसे मिळणार. काम सोप्पे, मोबदला मोठा आहे. हा मेसेज वाचून कोणालाही वाटेल की, संधी चांगली आहे. त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. तेथे मोबाईल नंबर देऊन रजिस्ट्रेशन केल्यानंतर लगेच टास्क मिळायला सुरुवात झाली. पहिल्या काही टास्कनंतर त्यांना सांगण्यात आले, तुम्ही प्रीमियम टास्कसाठी पात्र झाला आहात. थोडी गुंतवणूक करा, मग मोठा परतावा मिळेल आणि इथूनच फसवणुकीचा सगळा खेळ सुरू झाला.
आदित्यने टास्क पूर्ण करताना वेळोवेळी वेगवेगळ्या लिंकवर क्लिक करत गेला आणि बघता बघता त्याचे खाते रिकामे झाले. जेव्हा मोबदल्याची वाट बघूनही काहीच आले नाही, तेव्हा त्यांना कळले की, आपण एका सायबर सापळ्याचा बळी ठरलो आहे.
सध्या अनेकजण जॉबच्या शोधात असतात. याचाच आधार घेत सायबर चोरट्यांनी गंडा घालण्यासाठी हा नवीन स्कॅम शोधला आहे. सायबरतज्ज्ञांच्या मते, या स्कॅमसाठी बनावट वेबसाईटस्, टास्क पोर्टल्स, पेमेंट लिंक्स आणि सोशल इंजिनिअरिंगचा वापर केला जातो. विशेषतः, जे लोक घरबसल्या उत्पन्न मिळवण्याच्या शोधात असतात, त्यांना जास्त लक्ष्य केले जाते.
कोणताही जॉब मेसेज टेलिग्राम, व्हॉटस्पवर आला, त्यामध्ये लिंक असेल तर ती अजिबात ओपन करू नका.
कंपनीचा तपशील व वेबसाईट योग्यरीत्या तपासा.
कामासाठी पैसे मागितले जात असतील, तर तो सापळाच असेल हे नक्की.
स्वतःहून कोणतीही लिंक क्लिक करू नका.
फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार करा.
सध्याच्या या डिजिटल युगात असंख्य संधी आहेत खर्या; पण सोबतच फसवणुकीचे सावटही वाढतेय. घरबसल्या काही क्लिकमध्ये काम मिळेल, हे स्वप्न वाटते खरे; पण प्रत्येक संधीची खात्री न करता पुढे गेले, तर लाखोंचा गंडा बसू शकतो. त्यामुळे सतर्क राहा.