File Photo
तंत्रज्ञान

Gemini 4 Carbon : सुंदर पिचाई यांच्या नवीन AI मॉडेलवर मस्क यांनी दिली एका शब्दात दाद!

पिचाई यांनी 'एक्स' वर केली नवीन 'जेमिनी ४ कार्बन' मॉडेलबाबत पोस्ट

पुढारी वृत्तसेवा

Gemini 4 Carbon : गुगलच्या नवीन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता ) मॉडेलच्या लॉन्चिंगची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. खुद्द गुगलशी स्पर्धा करणारे जगातील सर्वात श्रीमंत उद्‍योगपती एलॉन मस्क यांनी या नवीन मॉडेलला एका शब्‍दात दाद दिली आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सुंदर पिचाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर नवीन 'जेमिनी ४ कार्बन' (Gemini 4 Carbon) मॉडेलबाबत पोस्ट केली होती. या पोस्टवर मस्क यांनी एका शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इम्प्रेसिव्ह....

सुंदर पिचाई यांच्या पोस्टवर कमेंट करताना एलॉन मस्क यांनी लिहिले, "इम्प्रेसिव्ह" (Impressive). मस्क यांच्या या प्रतिक्रियेवर सुंदर पिचाई यांनी हात जोडल्याचा (Folded-hands) इमोजी पाठवून उत्तर दिलं आहे. मस्क यांची ही कंपनी (SpaceXSI) गुगलसोबत थेट स्पर्धेत असतानाही त्यांनी गुगलच्या तंत्रज्ञानाचं उघडपणे कौतुक केल्याने टेक वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.

जुलै महिन्‍यातही केले होते कौतूक

विशेष म्हणजे, मस्क यांनी सुंदर पिचाई यांच्या पोस्टवर एका शब्दात प्रतिक्रिया देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी जुलै महिन्यात जेव्हा पिचाई यांनी गुगलच्या तिमाही आर्थिक निकालांबद्दल पोस्ट केली होती, तेव्हाही मस्क यांनी अगदी असाच एकच शब्द वापरून कौतुक केलं होतं.

काय आहे 'जेमिनी ४ कार्बन'?

गुगलने 'जेमिनी ४ कार्बन' हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली एआय मॉडेल असल्याचे म्हटले आहे. हे मॉडेल सायबर सुरक्षा आणि क्लिष्ट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.गुगलच्या अधिकृत माहितीनुसार, हे मॉडेल सॉफ्टवेअरमधील त्रुटी शोधणे, त्यांचा गैरवापर कसा होऊ शकतो हे तपासणे आणि त्यावरील सुरक्षेचे पॅचेस तयार करण्यास मदत करते. या क्षमतांमुळे सायबर सुरक्षा पथकांना सॉफ्टवेअरमधील उणिवा जलद गतीने शोधून धोक्यांचा सामना करणे सोपे होणार आहे.

दुप्पट अचूकतेने सुरक्षित कोड जनरेट करू शकते

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा त्रुटी शोधण्याच्या 'एसईसी-बेंच प्रो' (SEC-bench Pro) या चाचणीत 'कार्बन'ने ८८.२ टक्के गुण मिळवले आहेत; तर त्रुटी दुरुस्त करण्याच्या (patching) चाचणीत मॉडेलने ७१ टक्के गुण मिळवले आहेत. तसेच, मागील आवृत्तीच्या तुलनेत हे मॉडेल दुप्पट अचूकतेने सुरक्षित कोड जनरेट करू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र, हे गुगलचे स्वतःचे अहवाल असून, प्रत्यक्ष वापरामध्ये या कामगिरीत फरक असू शकतो.

सुरक्षिततेच्या कारणास्तव मर्यादित टप्प्यात रोलआउट

गुगलने सध्या 'जेमिनी ४ कार्बन' सर्वसामान्यांसाठी खुला न करता 'फेअरविंड प्रोग्राम' अंतर्गत केवळ निवडक सायबर सुरक्षा तज्ज्ञांसाठी उपलब्ध करून दिला आहे. व्यापक स्तरावर लाँच करण्यापूर्वी कंपनी सुरक्षेच्या सर्व उपायांची चाचणी घेत असून, हळूहळू विश्वासाक्षम भागीदारांपर्यंत हे मॉडेल पोहोचवले जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.अतिप्रगत सायबर सुरक्षा क्षमता असणारी एआय मॉडेल विकसित करताना संपूर्ण तंत्रज्ञान क्षेत्रात सुरक्षेचे मोठे आव्हान असते. सुरक्षेची तपासणी आणि दुरुस्ती करणारी हीच साधने गैरप्रकार करणाऱ्या लोकांच्या हातात गेल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. याच सुरक्षा कारणांमुळे प्रतिस्पर्धी कंपनी 'ओपनएआय'नेही अलीकडेच त्यांचे एक मॉडेल लाँच करणे थांबवले होते.

गुगल 'आर्गन' पाठोपाठ ,गुगल 'कार्बन'

किमतीच्या बाबतीत, गुगलने 'कार्बन'साठी प्रति १० लाख इनपुट टोकन्ससाठी २ डॉलर आणि प्रति १० लाख आउटपुट टोकन्ससाठी १० डॉलर अशी सुरुवातीची किंमत ठेवली आहे. दोन आठवड्यांपूर्वीच गुगलने 'आर्गन' (Argon) हे मॉडेल लाँच केले होते, त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच हे नवीन मॉडेल आणण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT