Wingo Gaming App Ban Pudhari
तंत्रज्ञान

Fake SMS Scam: युजर्सच्या फोनमधून जात होते बनावट SMS; सरकारने गेमिंग अ‍ॅपवर घातली बंदी, नेमकं काय घडलं?

Fake SMS Scam: विंगो या ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपचा वापर करून युजर्सच्या फोनमधून त्यांच्या नकळत बनावट SMS पाठवले जात असल्याचं उघड झालं. हा सायबर फसवणुकीचा प्रकार मोठ्या प्रमाणावर चालू असल्याचं लक्षात येताच सरकारने अ‍ॅपवर तातडीची बंदी घातली.

Rahul Shelke

Wingo Gaming App Ban:ऑनलाइन फसवणुकीच्या एका गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर केंद्र सरकारने ‘विंगो’ (Wingo) नावाच्या ऑनलाइन गेमिंग अ‍ॅपवर भारतात बंदी घातली आहे. तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. हे अ‍ॅप वापरणाऱ्या लोकांच्या मोबाईलमधून, त्यांच्या नकळत, मोठ्या प्रमाणात बनावट SMS पाठवले जात होते.

विशेष म्हणजे, ज्या युजर्सच्या फोनमधून हे मेसेज जात होते, त्यांना याची कल्पनाही नव्हती. जेव्हा हा गैरप्रकार उघडकीस आला, तेव्हा गृह मंत्रालयाने तातडीने कारवाई करत अ‍ॅपशी संबंधित संपूर्ण नेटवर्क बंद केलं.

परवानगीशिवाय फोनचा गैरवापर

सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ‘विंगो’ अ‍ॅपने युजर्सची कोणतीही परवानगी न घेता त्यांच्या मोबाईल डिव्हाइसचा वापर केला. या फोनमधून इतर लोकांना फसवण्यासाठी बनावट मेसेज पाठवले जात होते. यामुळे सामान्य नागरिक नकळत सायबर गुन्ह्याचा भाग बनत होते.

हा प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू होता की कोट्यवधी मेसेज पाठवण्याची तयारी करण्यात आली होती. याची माहिती मिळताच सरकारने यात हस्तक्षेप केला.

Android युजर्सना इशारा

या प्रकरणाबाबत इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अधिकृत माहिती दिली. Android युजर्सना ‘विंगो’ अ‍ॅप डाउनलोड करू नका आणि त्याचा वापर थांबवा, असा इशाराही देण्यात आला.

तसंच, या अ‍ॅपचे कंट्रोल सर्व्हर भारतात काम करू नयेत म्हणून त्यांना जिओ-ब्लॉक करण्यात आलं आहे. त्यामुळे भविष्यात या अ‍ॅपमार्फत कोणतीही संशयास्पद हालचाल होणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे.

प्रमोशन करणारे चॅनल्स आणि व्हिडिओही हटवले

सरकारची कारवाई फक्त अ‍ॅपपुरती मर्यादित राहिली नाही. ‘विंगो’ अ‍ॅपचा प्रचार करणारे चार Telegram चॅनल्स, ज्यात दीड लाखांहून अधिक युजर्स जोडलेले होते, तेही बंद करण्यात आले. याशिवाय, YouTube वर या अ‍ॅपचा प्रचार करणारे 50 हून अधिक व्हिडिओ हटवण्यात आले.

कोट्यवधी बनावट मेसेज थांबवले

गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, योग्य वेळी कारवाई केल्यामुळे सुमारे 1 कोटी 53 लाख बनावट SMS लोकांपर्यंत पोहोचण्याआधीच थांबवण्यात यश आलं आहे. हा एक संघटित सायबर फसवणुकीचा प्रकार होता, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

गेमिंग अ‍ॅप्सबाबत सरकारची भूमिका

संशयास्पद गेमिंग आणि जुगाराशी संबंधित अ‍ॅप्सबाबत भारताने याआधीही कडक पावलं उचलली आहेत. गेल्या वर्षी लागू झालेल्या नव्या नियमांनुसार जुगारावर आधारित अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या देशात फक्त स्किल-बेस्ड गेम्स आणि ई-स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्सनाच कायदेशीर मान्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT