

नागपूर : सायबर गुन्हेगारीला बळी पडत ७८ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक प्रकरण घडले होते. त्यानंतर पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईने संबंधिताला 34 लाख रुपये परत मिळाले आहेत.
एका मनी लॉंड्रिंगच्या प्रकरणात नाव आल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांनी ज्येष्ठ नागरिकाला गंडा घातला होता. या प्रकरणात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत एकाला राजस्थानमधून अटक केली. पोलिसांनी त्याचे अकाऊंट गोठवून त्यातून ३४ लाख रुपये पिडीत व्यक्तीला परत मिळवून दिले.
भारतीय विमानतळ प्राधिकरणातून निवृत्त झालेल्या या अधिकाऱ्याला ११ नोव्हेंबर रोजी तथाकथित पोलीस उपनिरीक्षक विजय खन्ना याचा फोन आला. जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी ५३८ कोटींची फसवणूक केली असून त्यांच्या बँक खात्यात या अधिकाऱ्याच्या खात्यातून २ कोटी रुपये ट्रान्सफर झाल्याचा दावा या सायबर गुन्हेगार आरोपीने केला. कठोर कारवाईची धमकी देत आरोपींनी अधिकाऱ्याला व्हिडीओ सुरू ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आरोपींनी कारवाईची भीती दाखवत या निवृत्त अधिकाऱ्याकडून ७८.५० लाख रुपये उकळले.
आपली फसवणूक झाल्याचे काही दिवसांनी अधिकाऱ्याच्या लक्षात आले व त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून या सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून मनी ट्रेलच्या माध्यमातून तपास सुरू होता. अखेर पोलिसांचे पथक राजस्थानमधील जयपूरमध्ये पोहोचले. पोलिसांनी ओमप्रकाश भवरलाल जाखड (४९) रा, जयपूर याला अटक केली. ट्रान्सिट रिमांड घेत त्याला नागपुरात आणण्यात आले. फसवणुकीत गुन्हेगाराने वापरलेली विविध बॅंक खाती गोठवून पोलिसांनी निवृत्त अधिकाऱ्याला ३४ लाख रुपये परत मिळवून दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार, कविकांत चौधरी, शैलेश निघुट, अजय पवार, रोहीत मटाले यांच्या पथकाने ही कारवाई केली.